Join us

Bogas Biyane : सदोष मका बियाणे निघाल्याने चार एकर मका जळाला, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 11:47 AM

Bogas Biyane : मका बियाणे सदोष निघाल्याने शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले आहे. जवळपास चार एकर क्षेत्रावरील मका पिकाचे नुकसान झाले

- गणेश बागुल नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) शेतकऱ्याने खरीप हंगामात मका लागवड (Maize Cultivation) केली होती. परंतु सदर बियाणे सदोष निघाल्याने शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले आहे. जवळपास चार एकर क्षेत्रावरील मका पिकाचे नुकसान झाले असून संबंधित कंपनीवर कारवाई करून भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्याकडून मागणी करण्यात आली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील (Baglan) नवी शेमळी येथे हा प्रकार घडला आहे. येथील लक्ष्मण बाजीराव वाघ या शेतकऱ्याने शेतात चार एकर सीडनेस्ट कंपनीचा मका बियाणे पेरला होता. मात्र पेरलेल्या मका पिकाला कणीस तयार न झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित बियाणे घेतलेल्या दुकानदारास शेतकऱ्याने फोनवरून सविस्तर माहिती दिली. दुकानदाराच्या सहकार्याने कंपनी प्रतिनिधी येऊन शेतकऱ्याच्या जळालेल्या मक्याचे फोटो काढून माहिती घेतली. 

चार दिवस उलटून देखील ना कंपनीचे अधिकारी, ना कोणी प्रतिनिधी शेतकऱ्याकडे येऊन विचारपूस केली. मका पेरणीआधी कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्याचे घरोघरी जाऊन बियाणे खरेदीसाठी आग्रह करतात, परंतु शेतकऱ्याचे नुकसान झाल्यावर कंपनी शेतकऱ्यांना सहकार्य करत नाही, त्यांच्या भूलथापांना बळी पडून शेतकरी असे सदोष बियाणे घेतात. या प्रकरणी मका पिकाचे पंचनामा करून शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

 १५० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती.... 

शेतकऱ्याने संताप व्यक्त करत कंपनीने नुकसान भरपाई द्यावी. चार एकर मक्यामध्ये २५ ते ३० क्विंटल मका देखील येणार नसल्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान बरोबर शेत तयार करण्यापासून तर पीक काढेपर्यंतची मेहनत देखील वाया गेली आहे. चार एकर पेरलेल्या मक्यामधून शेतकऱ्याला जवळपास १२५ ते १५० क्विंटल उत्पादन निघाले असते. परंतु सदोष मका बियाण्यामुळे हे नुकसान झाले. या शेतकऱ्याने मक्यासाठी जवळपास ६० ते ७० हजार रुपये खर्च झाला असून मका लागवडीसाठी एवढा खर्च झाला पण पदरी एक रुपयाही पडणार नसून शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान यामुळे झाले आहे. मका पेरणीसाठी आतापर्यंत केलेला खर्च

मका बियाणे खरेदी १५ हजार रुपये, पेरणीसाठी १० हजार रुपये, खते २० हजार रुपये, औषध फवारणी १० हजार रुपये, पाणी आणि मजुरीसाठी ८ ते १० हजार रुपये असा एकूण ६५ हजार रुपये खर्च  झाला आहे. 

पेरणीपासून ते आतापर्यंत पैशांचा खर्च झालाच मात्र मेहनतही घेतली होती. मात्र अशा पद्धतीने सदोष बियाणे निघाल्याने मोठं नुकसान झाले आहे. एकही कणीस आले नाही, जवळपास चार एकर क्षेत्रात मका लागवड केली होती, मात्र संपूर्ण पीक जळून गेले आहे. यामुळे आथिर्क नुकसानीबरोबर मनस्ताप झाला आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने त्वरित भरपाई करावी, कृषी विभागाने देखील याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात... - लक्ष्मण वाघ, शेतकरी, नवी शेमळी

टॅग्स :मकाशेती क्षेत्रशेतीनाशिक