Banana Seed : सध्या अनेक पिकांच्या लागवडीचा काळ असल्याने शेतकरी लागवडीत (Cultivation) व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकरी सुरुवातीला खात्रीशीर बियाणे घेऊन लागवड करत असतात, मात्र अनेकदा बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. असाच काहीसा प्रकार नेवासा येथील शेतकऱ्यास अनुभवास आला आहे. या शेतकऱ्याने पपईच्या हजार रोपांची लागवड केली. मात्र यातील 200 नर रोपे निघाल्याने शेतकऱ्याला नुकसानीचा सामना करावा लागला आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊया?
अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील शेतकरी भारत बाबुराव आरगडे यांनी पारंपरिक शेतीबरोबर फळबाग शेती करण्याचा ठरविले. त्यानुसार आरगडे यांनी पपई या पिकाला पसंती देऊन जळगाव येथील पाटील बायोटेक या कंपनीकडून एक एकर क्षेत्रासाठी लागणारी पपईची रोपे खरेदी केली. त्यानंतर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने लागवड करून बाग चांगल्या पद्धतीने उभी केली. मात्र या बागेमध्ये 30 टक्के पेक्षाही जास्त पपईमध्ये नर जातीचे झाडे असल्याचे आढळून आले आहे.
याबाबतीत आरगडे यांनी तालुका कृषी अधिकारी प्रताप कोपनर, पंचायत समिती नेवासा आणि तालुका कृषी अधिकारी हिरवे यांच्याशी संपर्क करून लेखी तक्रार दिली. त्यानुसार श्रीरामपूर विभागीय कृषी अधिकारी काळे साहेब, त्यांचे सर्व सहकारी आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी प्रत्यक्ष क्षेत्रास भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. याबाबत शेतकरी भारत आरगडे यांनी कंपनीच्या संबंधित विभागाकडे ऑनलाइन तक्रार केली होती, मात्र कंपनीने याबाबत प्रतिसाद दिला नसल्याचे ते म्हणाले. तसेच बियाणे नियंत्रण कायदा कायदा १९८५ कलम ९ नुसार बिल देणे बंधनकारक असताना, पाटील बायोटेक कंपनीकडे वारंवार विनंती करूनही अधिकृत बिल दिलेले नसल्याचे शेतकरी आरगडे म्हणाले.
शेतकरी भारत आरगडे म्हणाले....
शेतकऱ्यांकडून १५ नंबर जातीच्या पपईचे ७/८ रुपयाला पपईची रोपे मिळत आहेत. परंतु पाटील बायोटेक महाराष्ट्रातील एक नामांकित कंपनी असल्याने त्यांच्याकडून चांगल्या प्रतीचे दर्जेदार रोपे मिळतील, या आशेने १५ रुपये प्रती रोप दराने खरेदी केली होती. मात्र त्यामध्ये ३० टक्के पेक्षाही जास्त नर जातीचे झाडे निवडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. इतर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी लवकरच ग्राहक मंच, कोर्टात कंपनी विरोधात न्याय मागणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
कृषी विभागाचे विभागाचे म्हणणे काय?
याप्रकरणी शेतकरी भारत आरगडे यांनी पंचायत समिती नेवासा या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जानुसार पंचायत समिती तालुका निवारण समितीची विशेष तज्ञांचा प्रक्षेत्र भेट देखील झाली आहे. त्याचबरोबर प्लॉटचा पंचनामा देखील करण्यात आला आहे. त्यानुसार रोपवाटिका परवानाधारक यांनी तक्रार यांना बिल न देणे ही बाब बियाणे नियंत्रण आदेशाचे उल्लंघन असल्याने त्या अनुषंगाने संबंधित कंपनीवर कारवाई करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक पंचायत समिती नेवासा यांनी आदेशित केले आहे.
कंपनीचे म्हणणे काय?
कंपनी प्रतिनिधी सचिन मस्के म्हणाले की, हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेले वाण आहे. परिसरातील अनेक शेतकरी आमच्या कंपनीकडून हे वाण खरेदी करून नेत असतात. मात्र अद्याप कोणत्याही शेतकऱ्याची आमच्यापर्यंत तक्रार आलेली नाही. या व्हरायटीमध्ये नर रोपांची संख्या किती निघेल सांगता येत नाही. कारण अनेक शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड केली आहे, मात्र या शेतकऱ्याप्रमाणे इतकी नर रोपे निघाल्याची अद्याप एकही तक्रार आले नसल्याचे ते म्हणाले.