Join us

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेत बोगस लाभार्थ्यांनी अनुदान लाटले, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:33 IST

Pm Kisan Scheme : गावात अस्तित्वात नसलेल्या बोगस लाभार्थ्यांनी पीएम किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Scheme) लाभ घेतल्याचे उघडकीस आले.

नाशिक : जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील (Kalvan Taluka) भादवण गावात अस्तित्वात नसलेल्या १८१ बोगस परप्रांतीयांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Scheme) लाभ घेतल्याचे उघडकीस आले. यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत कृषी विभागाच्या तक्रारीनंतर २ लाख ९८ हजार रुपये अनुदान लाटत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना योजनेंतर्गत सहा हजार रुपयांची मदत केली जाते. मात्र, भादवण गावात अस्तित्वात नसलेले १८१ बोगस लाभार्थी समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यांच्या नावांची २०२० मध्ये नोंदणी झाली असून, ई-केवायसी झाली (PM Kisan E Kyc) नसल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. हे लाभार्थी परप्रांतीय असल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 

शिवाय, हे बोगस लाभार्थी हे बांगलादेशी असल्याचा संशयही व्यक्त केला होता. तालुका कृषी अधिकारी मिनल म्हस्के यांनी बोगस लाभार्थ्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १८१ बोगस लाभार्थ्यांनी ६६ योजनेंतर्गत नोंदणी केलेली असून त्यातील १४३ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित झालेला आहे. हा फसवणुकीचा प्रकार २६ ऑगस्ट २०२० ते ३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घडलेला आहे. कळवण पोलिसांनी कृषी विभागाच्या तक्रारीनंतर संबंधित १८१ बोगस लाभार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बेपत्ता लाभार्थ्यांना शोधण्याचे आव्हानबोगस लाभार्थीपैकी एकाचाही पत्ता माहिती नाही. हे लाभार्थी नेमके कुठले रहिवासी आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान आहे. कोरोना कालावधीत पीएम किसान पोर्टलवर सेल्फ रजिस्ट्रेशन सुविधा असल्यामुळे त्या बोगस लाभार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली होती. यादीत आढळून आलेले लाभार्थी बांगलादेशच्या लगतच्या गावातील पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगितले जाते. त्यांचे बँक खाते वेगवेगळ्या बँकेचे असल्याने बँकांना अपात्र लाभार्थीच्या खात्यामधून रक्कम काढून किंवा खात्याला होल्ड करण्याबाबतही पत्रव्यवहार करण्यात आल्याचे समजते.

कृषी विभागाने या बोगस १८१ लाभार्थ्यांविरुद्ध कळवण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. एकूण फसवणुकीची रक्कम २ लाख ९८ हजार इतकी आहे. १८१ पैकी १४३ जणांनी पहिल्या हप्त्याचा लाभ घेतला असून ३५ लोकांना हप्ता वितरित झालेला नाही. महसूल विभागामार्फत या रक्कम वसुलीचे प्रयत्न सुरू असून आता पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर चौकशीत नेमकी स्पष्टता होईल.- श्रीमती मिनल म्हस्के, तालुका कृषी अधिकारी, कळवण

Kaju Anudan : काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासन अनुदान आलं, जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेती क्षेत्रकृषी योजनाशेती