केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत आदिवासी विकास महामंडळ धानाची खरेदी करतात. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात संस्था आणि महामंडळाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत उपप्रादेशिक कार्यालय चिमुर व गोंडपिपरी अंतर्गत, हंगाम 2023-24 करीता खरेदी केंद्रे धान खरेदीकरिता मंजूर केली आहेत. या केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.
धान उत्पादक जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान लागवड करण्यात आली आहे. यावर्षी केंद्रांवर धान विक्रीस आणण्याकरिता शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळच्या आदिवासी विकास महामंडळ किंवा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करावी. सोबतच बँक खात्याची केवायसी पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी पूर्ण करून केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी भाताच्या शेतीची लागवड केली, अशा शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यात भात पीक घेत असल्याबाबत नोंद असणे आवश्यक आहे. यासंदर्भात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑनलाइन केली जात असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी 15 जानेवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. पीक पेऱ्यात भात पिकाची लागवड केल्याची नोंद सातबारा उताऱ्यात केली, त्याच शेतकऱ्यांनी नवीन सातबारा प्रत, आधार कार्ड, बँक पासबुक व एकापेक्षा अधिक खातेदार असल्यास त्यांचे संमतीपत्र जोडून भात उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंद करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुदत वाढविण्याची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. 15 पैकी 9 तालुक्यात भाताची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत दिली आहे. मात्र हा अवधी खूप कमी आहे. आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास रब्बी हंगामात अडचणीचे जात आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना ही मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य यांनी केली आहे.