- रवी जवळे परंपरेच्या चौकटी तोडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी (Cotton Farmer) प्रगती करावी, यासाठी कृषी विभागाने गतवर्षी चंद्रपूर जिल्ह्यात सेंद्रिय कापूस लागवड तंत्रज्ञानाला (cotton Cultivation) प्रोत्साहन दिले होते. यंदाही हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून कृषी संशोधक व कृषी विभागाची यंत्रणा कामाला लागली. कृषी संशोधकांशी संवाद साधून तयार केलेला हा लेख शेतकऱ्यांसाठी उन्नतीचा नवा मार्ग ठरू शकतो...
पेरणी कधी करावी?१५ ते ३० जून किंवा मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यावर पेरणी करावी. कपाशीची लागवड : सेंद्रिय शेतीसाठी शिफारसीत वाण देशी सुधारित वाण- एकेए-५, एकेए-७, एकेए-८, अमेरिकन सुधारित वाण-पिकेव्ही रजत, एकेए-०८१, एकेएल-९९१६, सुवर्णा शुभ्रा (बीटी बियाणे वापरू नये)चा वापर करावा. पेरणीचे अंतर : ६०x३० सें.मी किंवा ९०x३० सें.मी.वर असावी. उगवणीनंतर १५ ते २० दिवसाच्या अंतराने दोनदा डवरणी करावी. पीक फुलावर व बोंडे भरण्याचे अवस्थेत असताना पाण्याचा ताण पडल्यास १०-१२ दिवसांच्या अंतराने २-३ संरक्षक (एकसरी आड) ओलित द्यावे, असे सांगण्यात आले.
पूर्वमशागत व सेंद्रिय खतेसेंद्रिय खताने जमिनीचा पोत सुधारतो. कोरडवाहूसाठी तीन वर्षांतून एकदा व बागायती पिकाला दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिल्यास तणांची तीव्रता २० टक्यांपर्यंत कमी होते. शेवटच्या वखरणीपूर्वी कोरडवाहू लागवडीसाठी चांगले मुरलेले शेणखत ०५ टन/ हेक्टर (१०-१२ गाड्या) व बागायती लागवडीसाठी १० टन/ हेक्टर (२०-२५ गाड्या) शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. सोयाबीन कंपोस्ट, एरंडी, कडुनिंब ढेप, बोरूचे हिरवळी खता व गांडूळ खत उपलब्ध असल्यास प्रतिहेक्टर २.५ टन गांडूळ खत, शेणखत/ कंपोस्ट खतासोबत मिसळून घ्यावे. कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन, ज्वारी, मूग किंवा उडीद या पिकानंतर पुढील वर्षी कापूस अशी फेरपालट करावी, असा सल्ला कृषी संशाेधकांनी दिला.
काय आहे हे नवे लागवड तंत्रज्ञान?या पद्धतीत रासायनिक खतांचा वापर कमी करून किंवा शक्यतो टाळून अथवा तत्सम कृषी उत्पादनावर आधारित उद्योगातून निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांचा वापर केला जातो. काडी कचरा, धसकटे, तण, जनावरांचे मलमूत्र, अवशेष इत्यादी शेतात अथवा शेताबाहेर कुजवून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. डाळवर्गीय पिकांमुळे जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होत असल्याने या पिकांचा अंतर्भाव आंतरपीक पद्धतीत केला जातो. जैविक कीड नियंत्रण तत्त्वाचा अवलंब करून अल्पघातक कीटकनाशकांचा वापर केला जातो.
बीटी कापूस लागवड करणे टाळा सेंद्रिय कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली शेती सेंद्रिय प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. परपरागीकरण होऊ नये व विलगीकरण अंतर राखण्यासाठी चारही बाजूला ५० मीटर अंतरावर बीटी कापसाची लागवड करू नये. हे पीक सुमारे ६० ते ७५ सें.मी. पावसाच्या क्षेत्रात उत्तम येते. बियाणे उगवण चांगली होण्यासाठी १५ अंश सें. तापमान लागते. २७ ते ३३ अंश से. तापमानात फुलपाती व फळधारणा उत्तम होते. निचरा होण्यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड करावी किंवा दोन ओळीनंतर सरी काढावी.
कृषी संशोधकांची चमू सज्ज; शेतकऱ्यांना निश्चितच होणार लाभ !शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी व प्रकल्पप्रमुख डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, वरिष्ठ संशोधक डी. आर. भेंडारकर, प्रा. बी. जी. गोंडाने आदींचे पथक सज्ज आहे. शेतकऱ्यांसाठी उत्साहाने कर्तव्य बजावणारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाची यंत्रणा सल्ला देण्यास तत्पर आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे.
गतवर्षी सेंद्रिय कापूस लागवड तंत्रज्ञान अंतर्गत २३ कापूस वाणांची लागवड झाली होती. त्यात १८ बीटी, तर ७ नॉनबीटी वाण आहेत. बीटीची एकरी उत्पादकता ७ ते ८ क्विंटल इतकी अत्यल्प असताना प्रकल्पाच्या पहिल्या वर्षी नॉनबीटी वाणांपासून पावणेदहा क्विंटलचा उतारा मिळाला होता. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी हे लागवड तंत्रज्ञान स्वीकारल्यास मोठा लाभ होईल.- डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, प्रकल्पप्रमुख, कृषी संशोधन केंद्र, एकार्जुना