Join us

Agriculture News : क्षमता बांधणी प्रशिक्षण म्हणजे काय? ते शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आवश्यक का असते?  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 4:37 PM

Agriculture News : संचालकांना संस्थात्मक बांधणी सोबतच आवश्यक सॉफ्ट-स्किल,मॅनेजमेंट स्किल, बँकिंग सारख्या विषयांचे ट्रेनिंग देण्यात आले. 

नाशिक : राज्यभरातील २२ जिल्ह्यांतील १४३ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट (MAGNET) तर्फे सह्याद्री फार्म्स (Sahyadri Farms Nashik) या ठिकाणी नुकतेच क्षमता बांधणी प्रशिक्षण देण्यात आले. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बळकटीकरणासाठी संचालकांना संस्थात्मक बांधणी सोबतच आवश्यक सॉफ्ट-स्किल,मॅनेजमेंट स्किल, बँकिंग सारख्या विषयांचे ट्रेनिंग देण्यात आले. 

सह्याद्री फार्म्स येथे दि. ४ जुलै ते २२ जुलै दरम्यान झालेल्या क्षमता बांधणी प्रशिक्षणात राज्यभरातील  नाशिक,  संभाजी नगर, रत्नागिरी, लातूर, अमरावती, कोल्हापूर, पुणे, नागपुर (Nagpur) या आठ विभागांतून २२ जिल्ह्यांचा समावेश होता. त्यात रायगड, नाशिक, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नागपुर, जालना, संभाजीनगर, उस्मानाबाद, हिंगोली, अमरावती, धुळे, रत्नागिरी, सातारा, लातूर, बीड, बुलढाणा, जळगाव, धाराशीव, चंद्रपुर आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी सहभाग घेतला. 

राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाद्वारे आशियाई विकास बँक (एडीबी) अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, मॅग्नेट संस्थेमार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे राज्यातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जात  आहे. केळी, डाळींब, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरु, चिकु, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल), फुले, आंबा, लिंबू, काजू आणि पडवळ या निवडक पिकांवर प्रकल्प केंद्रित आहे.

संस्थात्मक क्षमता बांधणी प्रशिक्षणाच्या ४ बॅचेस पूर्ण झालेल्या आहेत आणि १४३ शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी यात सहभाग घेतला. ४४ महिला संचालकांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतला. येणार्‍या काही दिवसात आणखी बॅचेस आयोजित करण्याची योजना आखलेली असून यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, भागधारक आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत. 

प्रशिक्षणामुळे संचालकांमध्ये नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन कौशल्ये विकसित होत आहेत. मॅग्नेट प्रकल्पाचे संस्थात्मक क्षमता बांधणी प्रशिक्षण महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्राला मजबूती देण्यासाठी आणि त्याला अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कृषी व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्यास मदत होते आहे, ज्यामुळे राज्यातील फलोत्पादनात वाढ होईल. 

“मॅग्नेट प्रशिक्षणातून आम्ही आवश्यक कौशल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळाला आहे. आमचे ज्ञान अद्ययावत झाले असून  आम्ही आता अधिक आत्मविश्वासाने कृषी व्यवसाय करू शकतो. आम्हाला अडचणींवर मात करण्यासाठी नवीन प्रयोग करण्याची क्षमता आणि धाडस मिळाले आहे."- निलेश चौगुले,  संचालक, शाहू महाराज शेतकरी उत्पादक कंपनी कोल्हापूर

"मॅग्नेट प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी प्रशिक्षणाचा लाभ त्यांच्या सभासदांना द्यावा. तसेच कृषी व्यवसायाशी जुळलेल्या शेतकर्‍यांच्या कृषी उत्पादनात वाढ करून, प्रक्रिया व निर्यात या कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान द्यावे. राष्ट्राच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी प्रयत्न करावेत."- एस. वाय. पुरी, विभागीय प्रकल्प उपसंचालक, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, मॅग्नेट, नाशिक

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरी