Join us

Agriculture News : काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू बी अनुदानासाठी अर्ज सादर करावेत, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 5:04 PM

Agriculture News :राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे.

नाशिक : राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी (Cashew farmers) शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करून दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल ही बाब विचारात घेऊन 9 जुलै 2024 रोजीच्या शासननिर्णयान्वये २०२४ करीता काजू हंगामासाठी काजू उत्पादकांकरीता शासनाचे राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना (Cashew seed Scheme) कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी केले आहे

काजू बी अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी ची विक्री पावती, ७/१२ उतारा, आधार संलग्नित बचत बँक खात्याच्या क्रमांकासह तपशील, कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक आहे. तसेच काजू उत्पादक शेतकऱ्यांना ७/१२ उताऱ्यावर काजू लागवडी खालील क्षेत्र व झाडांची नोंद असणे आवश्यक आहे. 

शेतकऱ्यांना उत्पादकक्षम झाडांची संख्या व त्यापासून प्राप्त काजू बी उत्पादन हे संबंधित कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीकडील नोंदणीकृत परवाना धारक काजू व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था खरेदी विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांना काजू बी ची विक्री केलेली असणे आवश्यक आहे. काजू उत्पादक शेतक-यांनी विक्री केलेल्या काजू विक्री पावतीवर उपरोक्त नमूद करुन नोंदणीकृत खरेदीदारांचा जी.एस.टी. क्रमांक, शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव व पत्ता असणे आवश्यक आहे.

इथं साधा संपर्क 

नाशिक विभागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या प्रमाणपत्रासह अर्ज महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ विभागीय कार्यालय, शॉप क्र.६१८/६२३, मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर, दिंडोरी रोड,पंचवटी या कार्यालयात ३१ ऑगस्ट २०२४ पुर्वी सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी ०२५३- २५१२१७६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे कृषि पणन मंडळ, नाशिक चे उपसरव्यवस्थापक, श्री एस. वाय. पुरी यांनी कळविले आहे.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रनाशिकलागवड, मशागतसरकारी योजना