जळगाव :सिबील स्कोअर (Cibil Score) कमी असला तर कोणतीच बँक कर्जाला (bank Loan) उभी करत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र जिल्हा बँक सिबील स्कोअर कमी किंवा शून्य असला तरी कर्ज देत आहे. शेतकऱ्यांचा सिबील स्कोअर तपासू नये असे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत. या आदेशाचे जिल्हा बँकेकडून (District Bank) पालन केले जात आहे. दरम्यान, कोणाच्याही कर्जासाठी जामीनदार राहणे आता धोक्याचे ठरू शकते. सिबील स्कोअरलाही फटका बसू शकतो.
एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे कर्ज देताना बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था आदी आर्थिक संस्थांकडून दिलेल्या कर्जाच्या हमीसाठी जामीनदार आणण्यास सांगितले जाते. असा जामीनदार आणायची जबाबदारी ही कर्जदाराची असते. जामीनदार ही अशी व्यक्ती असते, जी दुसऱ्या व्यक्तीला कर्ज देण्यासाठी सहमती देत असते आणि जर कर्जदाराने कर्जाची (crop Loan) परतफेड केली नाही, तर त्या कर्जासाठी ती एकप्रकारे जबाबदारही असते. त्यामुळे जामीनदाराला कर्जाची परतफेड करावी लागते. गॅरंटर असणं म्हणजे कर्जदाराला मदत करणं असं नाही, ही केवळ औपचारिकता नसते. कर्जाची परतफेड कर्जदाराप्रमाणेच करण्यासाठी जामीनदारही जबाबदार असतो. जर तुम्ही जामीनदार झालात तर बँकही तुम्हाला कर्जदार मानते. कर्ज परतफेड न झाल्यास जामीनदारावरही कारवाई होते.
सिबील स्कोअर आणि सिबील रिपोर्ट म्हणजे काय?
जिल्हा बँकेकडून कर्ज देताना प्रत्येक शेतकऱ्याचा सिबील रिपोर्ट तपासला जातो. सिबील स्कोअर आणि सिबील रिपोर्ट यात फरक आहे. रिपोर्टमध्ये एका शेतकऱ्याने आणखी कुठे कर्ज घेतले आहे का?, त्याच्या उताऱ्यावर बोजा आहे का? याची तपासणी केली जाते. जिल्हा बँके व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेचा बोजा असला तर त्या शेतकऱ्याला कर्ज नाकारले जाते. खासगी बँका मात्र सिबील स्कोअर कमी असला तर शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत, जिल्हा बँक मात्र कर्ज देते.
जामीनदार होताना काय काळजी घ्याल?
ज्याच्या कर्जासाठी तुम्ही जामीन राहणार आहात तो कोणत्या प्रकारचे कर्ज घेत आहे, तो का आणि किती कर्ज घेत आहे. कर्ज फेडण्याची आर्थिक क्षमता आहे का, जर कर्जाची रक्कम संबंधित व्यक्ती भरू शकला नाही तर, त्याच्याकडे अन्य काही मालमत्ता आहे का, की ज्याची विक्री करून तो कर्जाची परतफेड करू शकतो, अशा सर्व मुद्द्यांचा विचार करूनच जामीनदार व्हावे.
सिबीलला बसू शकतो फटका
जर कर्जदाराने कर्ज फेडले नाही आणि ते बुडाले तर केवळ त्याच्या सिबील स्कोअरवर परिणाम होत नाही तर, कर्जासाठी जामीन राहिलेल्या व्यक्तीच्या सिबील स्कोअरवर देखील परिणाम होतो. परिणामी, जर भविष्यात जामीनदाराला कर्ज घ्यायचे असेल तर त्याला कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर जामीनदाराची ती जबाबदारी असते. सिबील स्कोर ७५० पेक्षा जास्त असावा. जास्तीत जास्त वेळा कर्ज घेणे, त्याची नियमित फेड करणे यामुळे सिबील स्कोअर चांगला होतो. खासगी बँका मात्र सिबील स्कोअर कमी असला तर शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत, जिल्हा बँक मात्र कर्ज देते. - जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा बँक