Join us

कापसाचे बियाणे घेताना महिलांमध्ये हाणामारी, अकोला जिल्ह्यातील कृषी केंद्रावरील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 3:39 PM

कापूस बियाणे खरेदीसाठी रांगेत उभे असताना दोन महिलांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले. 

अकोला : खरीप हंगाम काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे अकोट शहरातील कृषी सेवा केंद्रासमोर पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांना पाहिजे असलेल्या बियाण्यांच्या वाणाचा तुटवडा भासत असून, नंबर लावण्यावरुन वाद उद्भवत असल्याचे चित्र आहे. तर अकोटमध्ये कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर रांगेत असलेल्या शेतकरी महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. 

हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पाऊस जसजसा जवळ येत तशी शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते खरेदीसाठी जिल्ह्यात झुंबड उडाली आहे. खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. महिला शेतकरीही बियाणे खरेदीसाठी उतरल्या आहेत. सध्या तापमान पुन्हा वाढल्याने प्रखर उन्हात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसताना तासाभरापासून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना उभे राहावे लागत आहे. अशा स्थितीत बियाणे खरेदीसाठी रांगेत उभे असताना दोन महिलांमध्ये वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे समोर आले. 

... म्हणून लागते महिलांची रांग

एकीकडे अकोट तालुक्यात हे बियाणे खरेदीसाठी अमरावती, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी, त्यांचे नातेवाइक येत आहेत. प्रत्येक -जिल्ह्यातील बियाणे साठा ठरवून दिला आहे. तरीसुद्धा इतर जिल्ह्यातील गर्दी अकोट शहरात होत आहे. पहाटे 4 वाजेपासून कृषी दुकानांसमोर बियाणे खरेदीसाठी रांगा लागत आहेत. दुकाने सकाळी 08 वाजता उघडताच गर्दी होते. पुरुष शेतकऱ्यांची रांग मोठी असल्याने क्रमांक लागताच बियाणे तुटवडा पडतो. त्यामुळे आता शेतकरी महिलांचीसुद्धा दुसरी रांग लागत असल्याने यातूनच वाद निर्माण होत आहेत. 

जिल्ह्यात बियाणांचा तुटवडा 

अकोला जिल्ह्यात 1 लाख 53 हजार 636 हेक्टरवर कापसाची लागवड होणार आहे. शिवाय लागवड वाढणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने बियाण्यांचे नियोजन केले आहे, असे असले तरी शेतकऱ्यांना एका विशिष्ट कंपनीचे बियाणे हवे आहे. यामुळे आतापासूनच कापूस बियाण्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. कृषी सेवा केंद्रांवर गर्दी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांनी 'त्या' बियाण्यांची विक्री कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या देखरेखीतच करण्याचे आदेश काढले आहे.

टॅग्स :अकोलाकापूसमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती