Join us

Mango Cultivation : पैसे गोळा केले, गुजरातहून रोपे आणली, सहा हजार केसर आंब्याची लागवड, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 2:44 PM

Mango Cultivation : नाशिकच्या (Nashik) चार पाड्यांवर तब्बल सहा हजार केसर आंब्याची लागवड करण्यात आली आहे.

Agriculture News : नाशिकच्या  (Nashik) आदिवासी पट्ट्यात म्हणजेच पेठ,सुरगाणा, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) आदी भागात आंबा लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मागील काही वर्षात हा एकदा दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याद्वारे चांगलं उत्पन्नही मिळू लागले आहे. यंदा सुरगाणा (Surgana) तालुक्यातील करंजुल (सु.) या ग्रामपंचायतीमधील चार पाड्यांवर तब्बल सहा हजार केसर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. यासाठी जवळपास १७९ आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आंबा लागवड केली आहे. 

यंदा बाजारात देखील आंब्याची (mango cultivation) मोठी मागणी पाहायला मिळाली. शिवाय बाजारात नाशिकचाआंबाही भाव खाऊन गेला. या आदिवासी तालुक्यामध्ये मागील काही वर्षांपासून केसर, राजापुरी आदी आंब्याची लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे दरवर्षी या शेतामधून नाशिककरांसह इतरांना आंब्याची चव चाखायला मिळते आहे.  सुरगाणा या आदिवासी बहुल तालुक्यात यावर्षी करंजुल (सु.) या ग्रामपंचायतीमधील चार पाड्यातील १७९ आदिवासी बांधवांच्या शेतात तब्बल सहा हजार केशर आंब्याची रोपे लावण्यात आली. 

यात विशेष म्हणजे  विजयनगर, वडमाळ, बोरीचा गावठा या गावांमध्ये युवकांनी प्रत्येक महिन्याला पैसे गोळा केले. गुजरातमधील वासदा येथून केशर आंब्याची सहा हजार रोपे कमी दरात मिळवून विकत आणली. शेतकऱ्यांकडे किती क्षेत्र आहे, याचे गणित जमवत कमीत कमी ३०, तर जास्तीत जास्त १०० केशर आंब्याची रोपे आदिवासी शेतकऱ्यांना मोफत दिली. अगोदर खड्डे खोदा आणि लगेच रोपे घेऊन जा हे तत्व अंगीकारण्यात आले. शेतामध्ये आंब्याची झाडे लावल्यानंतर इतर भात, वरई, नागली, कडधान्याचे आंतरपीक घेता येईल, अशा पद्धतीने या रोपांची लागवड करण्यात आली.

सुरगाणा तालुक्यातील जंगल नामशेष झाले आहे. यावर उपाय म्हणून केशर आंब्याच्या झाडांची लागवड केली. यातून आदिवासी बांधवांना उत्पन्न मिळणार आहे. यामध्ये गावातील माझे मित्र व काही युवक स्वयं प्रेरणेने सहभागी झाले आहेत. या सर्वाच्या प्रयत्नाने तालुका लवकरच हरित होऊ शकेल.- मुरलीधर राठोड, स्थानिक 

आंबा लागवडीसाठी सामान्य सल्ला 

पावसाची तीव्रता कमी असताना झाडास खते द्यावीत. एक वर्षाच्या आंबा कलमास ५ किलो शेणखत ३२५ ग्रॅम युरिया, ३१२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि २०० ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश किंवा १६६ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा प्रति कलम द्यावी. हे प्रमाण दरवर्षी समप्रमाणात वाढवत न्यावे. दहा वर्षांवरील प्रत्येक आंबा कलमांस ५० किलो चांगले कुजलेले शेणखत ३ किलो २५० ग्रॅम युरिया ३ किलो १२५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २ किलो सल्फेट ऑफ पोटॅश किंवा १ किलो ६६० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा प्रती कलम बांगडी पद्धतीने द्यावी. खते कलमाच्या विस्ताराच्या आत सुमारे ४५ ते ६० सें.मी. रुंद आणि १५ सें.मी. खोल वर्तुळाकार चर खणून द्यावीत. या सोबतच २०० ग्रॅम अॅझेटोबॅक्टर व २०० ग्रॅम पी.एस.बी. शेणखतामध्ये मिसळून द्यावे. चरामध्ये प्रथम पालापाचोळा शेणखत त्यावर रासायनिक खते टाकून मातीने चर बुजवून घ्यावेत. पालाश खताची मात्रा सल्फेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून दिल्यास फळांमध्ये साका येण्याचे प्रमाण कमी होते. 

टॅग्स :आंबानाशिकशेती क्षेत्रहापूस आंबाशेती