नाशिक : मघा नक्षत्रात झालेल्या पावसाने (Rains) शेतकऱ्यांच्या खोळंबलेल्या कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील व येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पोळ कांदा लागवड (Onion Cultivation) होत असते. तर पश्चिम भागात मागील वर्षी शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी पाण्याअभावी जळाल्या होत्या. यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी खरिपातील सोयाबीन, मका पिकांमध्ये वाढ केल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी कमी प्रमाणात क्षेत्र ठेवले आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत असते. सध्या लागवडीचा काळ असल्याने शेतकरी लागवडीत व्यस्त आहेत. काही भागात पावसाची प्रतीक्षा होती, आता पावसाने पुन्हा दमदार कमबॅक केल्याने शेतकऱ्यांची लागवडीची चिंता मिटली आहे. जळगाव नेऊर यावर्षी येवला तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने सुरुवातीला टप्प्याटप्प्याने हजेरी लावल्याने खरीप पिकांची पेरणीदेखील त्याचप्रमाणे झालेली होती.
दरम्यान पावसाने गेले दहा बारा दिवसांपासून दडी मारली होती. या काळात कडक उन्हाचे चटके जाणवत होते. पण मघा नक्षत्रात जळगाव नेऊर परिसरासह येवला तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने होरपळत चाललेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. येवला पश्चिम भागात जळगाव नेऊर परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे खरिपाची पिके तरली असून शेतकरी अजूनही मोठ्या आणि दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
पिकांना मिळाला दिलासा
मागील आठवडाभर पाऊस असल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केलेला खर्च वाया जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली होती, मागील दोन दिवसांपासून दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह पावसाने आगमन होत असल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी पोळ कांद्यासाठी खरीप पिकांना फाटा देऊन जमीन पडीक ठेवतात. पण गेल्या दोन वर्षांचा अनुभव पाहता पोळ कांद्यावर येणारी विविध संकटे बघता शेतकऱ्यांनी खरिपातील मका, सोयाबीन या पिकाबरोबरच भाजीपाला पिकांची जोड दिली आहे.
कांदा पिकाला पर्यायी भाजीपाला शेती
यात अनेक शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची, टोमॅटो, तिखट मिरची, कोबी, फ्लॉवर, काकडी, कारले या पिकांची लागवड केली आहे. दरवर्षी कांदा लागवड करणाऱ्या मजुरांकडे शेतकऱ्यांची झुंबड असायची, पण नुकत्याच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून थंडावलेल्या कांदा लागवडीला सुरुवात झाली असून, सप्टेंबर महिन्यात बाजरी, मूग पिके सोंगणीनंतर कांदा लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे.