Join us

अवकाळीनंतर आता शंखी गोगलगायींचे संकट, टोमॅटो उत्पादक शेतकरी हैराण  

By गोकुळ पवार | Published: December 10, 2023 11:03 AM

आता टोमॅटो पिकावर शंखी गोगलगायीने आक्रमण केल्याने अवघे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

एकीकडे वातावरण बदलाचा परिणाम दुसरीकडे आता टोमॅटो पिकावर शंखी गोगलगायीने आक्रमण केल्याने अवघे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आधीच अल्प बाजारभाव आणि आता गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यासमोर नवीन संकट उभे राहिले आहे. त्यातच आता अवकाळीनंतर टोमॅटोवर देखील रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. 

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव विंचूर येथील शेतकरी सुनील सूर्यभान गवळी यांनी सहा दिवसांपूर्वी 20 गुंठ्यात टोमॅटोची  लागवड केली.मात्र, या पिकावर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्याने टोमॅटोचे रोप कुरतडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या गोगलगायीचा बीमोड करण्यासाठी औषधांचा दोन दिवसाआड वापर करूनही काहीच उपयोग होत नाही. चार पैसे हाती येतील. मुला-मुलीचे शिक्षण, लग्न करू अशी स्वप्न उराशी बाळगून टोमॅटोच्या शेतात दिवसरात्र शेतकरी राबत होता. परंतु, केंद्र सरकारने नेपाळहून टोमॅटो आयात करून शेतकऱ्याच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. त्यातच आता हाती आलेल्या पिकांवर शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

नवे संकट उभे

शेतकऱ्यांनी पुन्हा टोमॅटोची लागवड करून संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला. पण, मध्येच गारपीट व अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांना सर्वच पिकांवर महागडी औषधे फवारणीची वेळ आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कमी आणि खर्चात कमालीची वाढ झाली आहे. त्यात आता शंखी गोगलगायीने टोमॅटोवर आक्रमण केल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

काय उपाययोजना कराव्यात?

जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील गोगलगायी व तिची अंडी उघडे पडून सूर्यप्रकाश व नैसर्गिक शत्रूमुळे नष्ट होतील.पिकामध्ये कोळपणी करावी. त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या गोगलगायी उघडया पडून नष्ट होतील.भाजीपाला पिकाच्या भोवती झेंडू सापळा पीक म्हणून लावावे.फळझाडे, तुती बागेमध्ये व बाजूला वेलवर्गीय पिके जसे चवळी, शेंगवर्गीय भाजीपाला यांची लागवड करू नये.तुषार सिंचनाऐवजी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास आर्द्रता कमी होईल. त्यामुळे गोगलगायींना प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल.शेतातील अवजारे, साहित्य दुस­या जागी घेऊन जाताना स्वच्छ करून घेऊन जावे. जेणेकरून त्यासोबत गोगलगायीचा प्रसार होऊ नये.

टॅग्स :शेतीनाशिकटोमॅटो