Agriculture News : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सात विविध कार्यकारी सोसायट्यांना गोदामांची श्रीमंती लाभली आहे. या सोसायट्यांमधील शेतकऱ्यांना आता दीर्घकाळ कृषीमालाची सुरक्षितपणे साठवण करता येणार आहे. त्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
'गाव तेथे गोदाम' या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी संघ, वि. का. सोसायट्यांसह शेतकऱ्यांना २५० टन शेतीमाल साठवणूक क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येत आहे. महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार डिझाइन, स्पेसिफिकेशन, खर्चाचे अंदाजपत्रकाप्रमाणे बांधकाम या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक असते. या निकषांसह नियमांची पडताळणी केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी जिल्ह्यातील सात विकास सोसायट्यांशी चर्चा केली.
अचूक व निर्दोष प्रस्ताव सादर करीत त्यांनी शासनाकडे सादर केले. त्यानुसार सात वि. का. सोसायट्यांना गोदाम उभारणीचा पाया रचला. ७ पैकी ५ सोसायट्यांच्या गोदामांचे काम पूर्ण याले आहे गोदाम उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह वि.का. सोसायट्यांनीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. - गौतम बलसाणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.
गावनिहाय गोदामांची क्षमता पाहिले असता रावेर तालुक्यातील मोरगाव येथे 2223 मेट्रिक टन, यावल तालुक्यातील कठोरा येथे 600 मेट्रिक टन, जळगाव तालुक्यातील कानळदा येथे 200 मेट्रिक टन, भादली येथे 2500 मॅट्रिक टन, पिलखेडे येथे 500 मेट्रिक टन, जामनेर तालुक्यातील हिवरखेडे येथे 1500 मेट्रिक टन, यावल तालुक्यातील हिंगोणे येथे 200 मेट्रिक टन अशी क्षमता आहे.