Join us

Nagpur : तेंदूपत्ता संकलनाचे टेंडर निघालं, मात्र ठेकेदारांनी कामचं घेतलं नाही, कारण.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 12:18 PM

यावर्षी मात्र, तेंदूपत्ता संकलनाचे टेंडर निघाल्यानंतरही कुठल्याच ठेकेदाराने काम स्वीकारलेले नाही.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील (Nagpur) कुही तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरातून तेंदूपत्ता संकलनासाठी दरवर्षी टेंडर काढण्यात येते आणि ठेकेदारामार्फत मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता संकलित केला जातो. यावर्षी मात्र, टेंडर निघाल्यानंतरही कुठल्याच ठेकेदाराने काम स्वीकारलेले नाही. परिणामी, तालुक्यातील शेकडो शेतमजूर आर्थिक मिळकतीपासून वंचित राहिला आहे.

तेंदूपत्ता संकलनाच्या (Tendupatta collection) माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब गरजवंताला हंगामी रोजगार प्राप्त होतो. या कामात एक कुटुंब महिन्याला किमान २० हजार रुपये कमावते. पहाटेपासून तर रात्रीपर्यंत अख्ख कुटुंब या कामात गुंतलेले असते. शेत, मुलांचे शिक्षण, लग्न सराई आदींसाठी थोडासा का होईना, या कामाचा हातभार लागत असतो.

मात्र, यावर्षी कोणत्याच ठेकेदाराने तेंदूपत्ता संकलनाचे टेंडर स्वीकारले नसल्याने कुही तालुक्यातील पचखेडी बिटअंतर्गत येणाऱ्या वेलतूर, सोनपुरी, बोथली, धानला, गडपायली, टेकेपार, म्हसली, चन्ना, रुयाड, टेकेपार या ११ गावांतील संकलन केंद्र बंद झाले आहे. परिणामी, या हंगामी परंतु निश्चित रोजगारापासून शेकडो ग्रामीण वंचित झाले आहेत.

उन्हाळ्यात २५-३० दिवस तेंदूपत्ता संकलनाचे काम चालत असते. त्यासाठी अख्खे कुटुंबच कामाला लागते. यातून मिळणाऱ्या मजुरी आणि बोनसमुळे मजुरांच्या कुटुंबाला चांगला हातभार लागतो. मात्र, यंदा ठेकेदाराने काम घेतले नाही. त्यात आमचा काय दोष. यावर शासनाने उपाय शोधून आम्हा मजुरांना मदत जाहीर करावी.

- धनपाल लांडगे, तेंदूपत्ता मजूर

हंगामी रोजगार हिरावला गेला

कृषी व्यवसायावर निर्भर असलेल्या ग्रामीण भागातील नागरिक हंगामी रोजगारावर विसंबून असतात. त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा वर्षभराचा आर्थिक नियोजन केला जातो. तेंदूपत्ता संकलन या हंगामी रोजगारातून संपूर्ण कुटुंबीय बऱ्यापैकी रक्कम कमावत असतात. मात्र, यंदा हा रोजगार हिरावला गेल्याने, कुही क्षेत्रातील अनेक कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले जाणार आहे. याकडे शासनाने व शासनाच्या प्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.  

टॅग्स :शेतीनागपूरशेती क्षेत्र