वर्धा : आपल्या देशात जुगाडू लोकांची संख्या कमी नाही. आपल्या गरजेतून नवीन शोध लावून आणि जुगाड करून त्याचा चांगला उपयोग घेत आर्थिक फायदा करीत असल्याचे पवनार येथील धाम नदीच्या तीरावर असाच एक जुगाडू दिसून आला. पारंपरिक पद्धतीच्या भट्टीला रामराम करून बॅटरीवर चालणारी भट्टी घरगुती साधनातून तयार केली असून, नीलेश बाबाराव हिवरे यांनी त्रासातूनही मुक्ती मिळवली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, ठिकठिकाणी कणीस भाजणारे दिसून येत आहेत. रिमझिम पाऊस आणि नदी परिसरात असाल तर भाजलेले कणीस खाण्याची मजाच काही और. सध्या तरी पवनारच्या धाम नदीच्या काठावर आणि कणसांच्या बंडीवर शौकीनांची तोबा गर्दी दिसून येत आहे. नीलेश हिवरे यांनी धाम नदीच्या तीरावर कणसाची गाडी लावली आहे.
कणीस भाजण्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या भाता आणि भट्टीऐवजी चक्क मसाल्याचा स्टिलचा डब्बा आणि लहान सिलिंडरचा वापर करून भाता आणि भट्टीचा जुगाड केला आहे. नीलेश हिवरे हे दोन महिने कणीस विक्रीची बंडी लावतात. नंतर ठिकठिकाणच्या बाजारात जाऊन खेळण्यांची दुकाने लावून उदरनिर्वाह भागवितात. सध्यातरी कणसाची हातगाडी हाच त्यांचा आर्थिक भार सांभाळत आहे. भाजलेले कणीस खाण्यासाठी खवय्ये गर्दी करु लागले आहेत
असा केला जुगाड...
नीलेश यांनी स्टिलचा डबा घेऊन झाकणाला छिद्र पाडले. आतमध्ये १८ एम.एम. पत्र्याचा छोटा पंखा तयार करून डब्यात बसविला. शेतात फवारणी करण्याच्या पंपाची १२ व्होल्टची मोटर बसवली. वायरिंग करून रेग्युलेटर बसविण्यात आले. हा संपूर्ण भाग भात्याचा झाला. नंतर त्यांनी भट्टी लावण्यासाठी लहान सिलिंडर अर्धे कापून त्याला व्यवस्थित पाइपने जोडून घेतले. बटन दाबले की, डब्यातील पंखा सुरू होतो आणि भट्टीत हवा जायला लागल्याने भट्टीतील लाकडे पेटायला लागतात. यात कमी-जास्त करायला रेग्युलेटर आहेच. कमी खर्च आणि फुंकण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळाली आणि दिवसभर फूं फूं करायची गरजही नाही. अगदी कमी खर्चात आणि बाजारात साहित्य उपलब्ध असल्याने अडचण नाही.