Join us

Soyabean Harvesting : बाजारभावापेक्षा सोयाबीन काढणीचा खर्चचं अधिक, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 2:05 PM

Soyabean Harvesting : सोयाबीन (Soyabean) तर आलेच नाही उलट ज्या शेतकऱ्यांचे थोडेफार उत्पन्न हाती आले आहे.

नंदुरबार : यंदा क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. सोयाबीन (Soyabean) तर आलेच नाही उलट ज्या शेतकऱ्यांचे थोडेफार उत्पन्न हाती आले आहे. सद्यस्थितीत सोयाबीन कापणीसाठी शेतकऱ्यांना एकरी पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे हा हार्वेस्टिंग यंत्रांचा (Harvesting Machine) खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

यंदा सोयाबीन उत्पादकांचे (Soyabean Farmer) चांगलेच कंबरडे मोडले आहे. सोयाबीन काढणीला आले अन् पावसाने धुमाकूळ घातला. त्यात पावसात वाचलेले सोयाबीन कसे बसे काढून बाजारात आणले, तर समाधानकारक दर नाही. ऐन दिवाळीतही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) प्रकाशा परिसरामध्ये ३५ इंचपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यामुळे परिसरातील कापूस आणि सोयाबीन पूर्णतः मातीमोल गेले आहे. सोयाबीन काढून त्या ठिकाणी रब्बी हंगामाचे पीक घेण्यासाठी शेतकरी आता तयारीला लागले आहेत.

याच परिसरात मागील वर्षी शेतकऱ्यांनी एकरी ९ ते १० क्विंटल सोयाबीन उत्पन्न (Soyabean Production) काढले होते. मात्र, यंदा परतीच्या पावसाचे पाणी सोयाबीन पिकांत साचल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले. अति पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पीक हातचे गेले. जे थोड्याफार प्रमाणावर आले ते म्हणजे एकरी १ किंवा २ क्विंटलच आणि एक दीड क्विंटल सोयाबीन काढण्यासाठी हार्वेस्टिंगच्या खर्च ही निघणे कठीण होऊन बसले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच पेरणीच्या वेळेस झालेला खर्च, त्यानंतर वेळोवेळी टाकलेले खत-बी-बियाणे याचावर झालेला खर्च निघणेही दुरापास्त झाले आहे. आता शेत रिकामे करण्यासाठी हार्वेस्टिंग खर्च करावा लागत आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

त्या शेतकऱ्यांनी काय करावे... 

तसेच एक रुपयात विमा काढला होता. आता ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही त्यांनी काय करावे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. लोकमतने गेल्या आठवडाभरापूर्वी नुकसानग्रस्त शेत शिवाराचा पंचनामा करण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. प्रशासनाने वृत्ताची दखल घेत गेल्या ५-६ दिवसांपासून पंचनामा करण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यांनी झालेल्या नुकसानीबाबत फोनद्वारे तक्रार केली होती. त्यांचे अद्यापही यादीत नाव आलेले नाही. तर त्या शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रशेतीबाजारनंदुरबार