पांढरकवडा : नगदी पीक म्हणून आजही कापसाचा उल्लेख केला जातो. मात्र यंदा कापसाने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खरीप हंगामात यावर्षी कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची अपेक्षा आहे. शिवाय लागवड खर्चाइतकेच पीक हातात येत असल्याने उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न कापूस उत्पादकांसमोर आहे.
कापसाचे पीक हे मुख्य व रोख उत्पन्न देणारे मानले जाते. त्यामुळे आजही पांढरकवडा तालुक्यात 22 हजार हेक्टरवर कापसाची लागवड होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून या पिकाला दुष्काळाचे, विविध रोगांचे, महागाईचे, कमी भावाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे कापसाची शेती आता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळच ठरत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने मदत जाहीर केली. मात्र, अनेकांपर्यंत ही मदत पोहोचलीच नाही. शेतकऱ्यांनी यावर्षी एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा काढला. विमा कंपनीकडून मदत मिळेल, या अपेक्षेने असणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा कंपनीकडून अक्षरशः भ्रमनिरास झाला. कापूस आणि सोयाबीनचे भाव कमालीचे घसरत आहेत. खासगी जिनिंगचे वजन काटे अनेक ठिकाणी सदोष असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
कापसाचे दर सहा हजार ते सहा हजार 500 रुपयांवर स्थिरावल्याने कापूस उत्पादकांचे आजच अवसान गळाले आहे. कापूस बेचणीच्या मजुरीचा दर हा क्विंटल मागे 800 वरून 900 रुपयांवर पोहोचला आहे. मजुरीचे दर वाढवूनसुद्धा वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. एक एकरात कापसाच्या लागवडीसाठी 34 ते 35 हजार रुपये खर्च येतो. यामध्ये खत आठ हजार, बियाणे एक हजार 600, निंदण सात हजार रुपये, डवरणी दोन हजार, फवारणी 700 रुपये, नांगरणी 1800, वखरणी एक हजार 200 क्विंटलमागे वेचणी खर्च 800 ते 900 रुपये व इतर खर्च आहे. हा खर्च करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँक, सहकारी बँक यांच्याकडून हेक्टरी 60 ते 65 हजार रुपये पीक कर्ज देण्यात येते. म्हणजे एकरी 24 हजार ते 24 हजार 500 इतके कर्ज दिले जाते. ही सर्व रक्कम गुंतविल्यानंतर काढलेल्या कर्जाचे वर्षभरात व्याजही शेतकऱ्यांना द्यावे लागते.
शेतमजुरांची मजुरीही वाढली
प्रत्येकवर्षी उत्पादनात घट होत चालली आहे. एवढे करूनही वेळेवर मजूर न मिळाल्यामुळे पिकांचे नुकसान होते. बऱ्याचदा कापूस वेचणीस मजूरच मिळत नाही, त्यामुळे हाती आलेले पीक खराब होते. याचा परिणाम बाजारपेठेत दिसून येतो. त्यातच आता शेतमजुरांची मजुरीही वाढली आहे. त्यामुळे पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागत आहे. काही शेतकरी तर बाहेरगावाहून शेतमजुरांना ऑटोने घेऊन येतात.