Join us

Cotton Production : यंदा कापसाचे उत्पादन 30 ते 35 टक्क्यांनी घटण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 1:13 PM

Cotton Production : यंदा अतिपावसामुळे कापसाला सर्वाधिक फटका बसला असून, कापसाचे उत्पादन यंदा ३० ते ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. 

जळगाव : यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Rain) झालेला आहे. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक दिवस शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. यामुळे कापसाची जी वाढ अपेक्षित होती, ती वाढ यंदा होऊच शकली नाही. यामुळे यंदा अतिपावसामुळे कापसाला सर्वाधिक फटका बसला असून, कापसाचे उत्पादन (Cotton Production) यंदा ३० ते ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. 

यंदा जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) ५ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी करण्यात आली होती. त्यात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे कापसाला फायदा झाला. मात्र, जुलै व ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना शेतातील मशागतींना अनेक दिवस वाफसा मिळाला नाही. यामुळे मशागतीची कामे रखडली, यासह फवारणीदेखील शेतकऱ्यांना करता आली नाही.

त्यातच सलग पावसामुळे कापसाची वाढ खुंटली, एका झाडाला जेवढ्या कैऱ्या लागणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते. तेवढ्या कैन्ऱ्या देखील लागल्या नाहीत. यामुळे कापसाच्या उत्पादनात यंदा मोठी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा पाऊस चांगला होऊनही  कापसाला फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

कापसाचा उतारा ३ ते ४ क्विंटलवर एका बिघा शेतात जर सर्व परिस्थिती चांगली राहिली तर ७ ते ९ क्चिटलपर्यंतचा उतारा मिळत असतो. मात्र, यंदा कापसाची वाढच झाली नसल्याने यंदा कापसाचा उतारा बिध्यात ३ ते ४  क्विंटलपर्यंत राहू शकतो. जळगाव तालुक्यातील आसोदा, भादली पट्टयात तर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कापसावर तणनाशक मारल्याचेही प्रकार समोर आले आहेत. शेतकऱ्यांनी याठिकाणी कापसाऐवजी आता दादरची लागवड सुरु केली आहे.

गेल्यावर्षीही ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत झाले होते नुकसान... यंदा अतिपावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज व्यक्त होत असताना, गेल्यावर्षी कमी पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत कापसाच्या उत्पादनात घट झाली होती. चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव, चोपडा या तालुक्यांमध्ये तर ६० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले होते. यंदा मात्र, अतिपावसामुळे कापसाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षी तरी कमी पावसामुळे उतारा कमी होऊन काही अंशी कापसाचे उत्पादन मिळाले होते. यंदा तर अतिपावसामुळे तेवढेही उत्पन्न मिळणार नाही. नाईलाजास्तव कापसावर तणनाशक मारावे लागले. त्यामुळे आता दादरची लागवड करण्याची वेळ आली आहे. - किशोर चौधरी, शेतकरी, आसोदा

पावसाने उसंत घेतली असल्याने, कृषी विभागाकडून प्रत्यक्ष बांधावर जाऊन, पाहणी केली जात आहे. सध्यातरी कापसाचे नुकसान झाले आहे असे म्हटले जाऊ शकत नाही. ठराविक भागांमध्येच कापसाचे नुकसान झाले आहे. मात्र, पाहणी अंती कापसाची स्थिती चांगली आहे. - कुर्बान तडवी, जिल्हा कृषी अधीक्षक 

टॅग्स :कापूसशेती क्षेत्रजळगावशेती