'भाऊ, शेताला पाणी नाही, का, हाताला काम नाही, पण जेवढी आहे, तेवढ्या जमिनीवर काबाड कष्ट करून शेती पिकवतो. पण जी शेती पिकवली जातेय, ती वनविभागाची असल्याने कधी हातची काढून घेतील, हे सांगता येत नाही. म्हणून मोर्चात सहभागी झालोय, पाहू आता काय व्हतंय...चालावं लागलं, भांडावं लागलं, त्याशिवाय न्याय मिळलं का?' किसान लॉन्ग मार्चमध्ये सहभागी झालेल्या दिंडोरी तालुक्यातील बेरवण येथील मंजुळाबाई यांनी गाऱ्हाणं मांडलं.
2023 च्या मार्च महिन्यात नाशिकहुन निघालेलं लाल वादळ मुंबईच्या दिशेने गेल्यानंतर सरकारला घाम फुटला होता. हजारोच्या संख्येने आलेल्या आदिवासी कष्टकरी शेतकऱ्यांनी मागण्या पूर्ण होतील, या आशेने हा लॉन्ग मार्च काढला होता. शिवाय या मोर्चाला ऐतिहासिक प्रतिसाद देखील लाभला होता. यावेळी सरकारने आश्वासने देत लॉन्ग मार्च थांबवला होता. मात्र पुन्हा एकदा हे लाल वादळ नाशिकमध्ये धडकलं आहे. यावेळी केवळ नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यापुरतं हा लॉन्ग मार्च असल्याचे सांगण्यात आले आहे. याच लॉन्ग मार्चमध्ये अनेक कष्टकरी शेतकऱ्यांसह महिला वर्ग सहभागी झाला आहे.
साधारण शनिवारी सकाळच्या सुमारास पंधरा दिवसांच्या मुक्कामाच्या उद्देशाने हा लॉन्ग मार्च विविध भागातून नाशिक शहराकडे मार्गस्थ झाला. काल दुपारच्या सुमारास म्हणजेच दोन दिवसांच्या पायी प्रवासानंतर हा लॉन्ग मार्च जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्मार्ट रोडवर विसावला आहे. तत्पूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी लॉन्ग मार्चचे नेतृत्व करणारे माकपचे माजी आमदार जेपी गावित यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून काही तोडगा निघाला नाही. आणि लॉन्ग मार्च याच ठिकाणी महामुक्काम आंदोलनाच्या माध्यमातून स्थिरावला आहे.
यावेळी त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ असा एक किलोमीटरचा स्मार्ट रस्ता शेतकऱ्यांनी व्यापून टाकल्याचे पाहायला मिळाले. सकाळची वेळ असल्याने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील स्मार्ट रस्त्यावर पेटलेल्या चुली.. स्वयंपाकाची सुरु असलेली तयारी.. कुठे खिचडी भात, तर कुठे पिठलं.. तर काही जणांनी सोबत आणलेली चटणी भाकरी पोटात ढकलण्याचे काम सुरु होते. याचवेळी वाढपी म्हणून काम करताना काही आंदोलक दिसले. त्यांच्याशी चर्चा करताना लक्षात आलं की, जवळपास आठ दिवस पुरेल इतके शिधा सोबत आणला आहे. यावेळी एकजण म्हणाला कि, आठच काय पण पंधरा दिवस लागले तरीही आम्ही मुक्काम सोडणार नाही, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. शिधा संपला तर दोन जण जाऊन घेऊन येतील, पण आम्ही मागे हटणार नाही, असं ते म्हणाले.
यावेळी जेवण सुरु असताना दुसरीकडे सामान सांभाळत बसलेले पेठ तालुक्यातील विठ्ठल गावित भेटले. त्यांना जेवणाविषयी विचारलं, तर ते सांगतात, 'ऊन खूप वाढलंय, खिचडी भाताशिवाय काही खायला नाही, त्रास व्हायला नको, म्हणून नाही जेवलो, रात्रीची एक भाकर शिल्लक आहे, तीच खाणार आहे. आपल्यामुळे इतर मोर्चेकऱ्यांना त्रास नको, म्हणून नाही जेवलो. जेवण आज काय उद्या करू, पण सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, आम्हाला जमिनी मिळवून द्याव्या, म्हणून चाललय सर्व, हे भेटलं म्हणजे आम्ही माघारी जायला मोकळे..'. असंही गावित म्हणाले.
जमीन नावावर झाली पाहिजे, म्हणून...
सादडपाडा येथील पांडू कांशीराम ठेपणे हे दुसऱ्यांदा मोर्चात सहभागी झाले. ते म्हणाले की, मागील वर्षीही मोर्चात सहभागी झालो होतो. त्यावेळी मुंबईपर्यंत पोहचलो, वाटलं होतं, मागण्या पूर्ण होतील, पण असं झालं नाही, आता शेवटी चालता येत नसताना परत यावं लागलं, बापजाद्यापासून जमीन कसत आहे, ती नावावर झाली पाहिजे, म्हणून हा सगळा आटापिटा चाललाय, जमीन नावावर झाली म्हणजे निदान शेतीतून उत्पन्न मिळवता येईल, म्हणून सरकारने आमच्या सारख्या शेतकऱ्यांचा विचार करावा', असं केविलवाण्या नजरेने सांगत होते.
आदिवासी शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च नित्याचा....
गेल्या काही वर्षांत अनेकदा लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातून अनेक शेतकरी या लॉन्ग मार्चमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले. या लॉन्ग मार्चमधील महत्वाची मागणी म्हणजे वनजमीन कसणाऱ्यांच्या नावे झाली पाहिजे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण आदी तालुक्यातील आदिवासी शेतकरी आजही वनपट्ट्यातील जमिनी कसत आहेत. त्याव्यतिरिक्त या शेतकऱ्यांकडे पुरेशी जमीन नसल्याने उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. अशा स्थितीत कसत असलेली जमीन शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शेतकरी लॉन्ग मार्च मध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे.