जळगाव :नाशिक जिल्ह्यात झालेल्या अल्प पावसामुळे खरीप पिकांना चांगलाच फटका बसला, कमी पर्जन्यमानामुळे पाणी पातळीत वाढ झाली नाही. तरीही शेतकऱ्याने हार न मानता नव्याने रब्बीसाठी मका, ज्वारी, हरभरा, गहू अशा पिकांची पेरणी केली. गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने शेतात उभी असलेली कांदा, ज्वारी, हरभरा, गहू पिके या वातावरण बदलामुळे रोगांच्या कचाट्यामध्ये सापडण्याची भीती आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली असली तरी जिल्ह्याच्या अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून त्याचा परिणाम रब्बी हंगामात दिसून येत असून यंदा रब्बीचा पेरा मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाला असून यंदा तो एक 76.24 टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यात मालेगाव, येवला, सिन्नर हे तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. तसेच चांदवड व नांदगाव तालुक्यात काही मंडळे हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. देवळा. बागलाण, नांदगाव यात रब्बीची पेरणी 50 टक्क्यांच्या आत आहे. येवला तालुक्यात 10 हजार 653 हेक्टर क्षेत्रावर रच्बीची पेरणी झाली असून सिन्नर तालुक्यात 19 हजार 276 हेक्टर क्षेत्रावर रथ्वीची पेरणी झालेली आहे, तर दिंडोरी तालुक्यात वहा हजार 714 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झालेली आहे.
तीन तालुक्यांमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर
विशेष म्हणजे येवला आणि सिन्नर तालुक्यात दुष्काळी तालुके असूनही अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर रब्बीचा पेरा केलेला आहे. निफाड तालुक्यात 8371 तर दिंडोरी तालुक्यात 7786 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. येवला 580 हेक्टर, नांदगाव 1102 हेक्टर, सिन्नर 4331 हेक्टर, चांदवड 446 हेक्टर तालुक्यात हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झालेला आहे. तसेच येवला, चांदवड, नांदगाव या भागात चाऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याने या भागात मका पिकाचा पेरा वाढलेला असून निफाड, मालेगाव तालुक्यातही मका पिकाचा पेरा वाढला.
गळीत धान्य पिकांचे क्षेत्र शून्यावर
जिल्ह्यात 25, 388 हेक्टरवर हरभरा पेरणी झालेली आहे. या वर्षी जिल्ह्यात गळीत धान्य पिकांचे क्षेत्र शून्यावर असून त्यामध्ये करडई, सूर्यफूल, जवस, तीळ ही पिके असून ही पिके पूर्वी मोठ्या प्रमाणात घेतली जात होती, पण कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात जवळपास या चारही गळीत धान्य पिकाचा पेरा शून्यावर असून दिवसेंदिवस तेलबिया क्षेत्र कमी होऊन हद्दपार होण्याची चिन्हे दिसत आहेत.