भंडारा : यंदा भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात ७८३.७७ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वितरणाचे लक्षांक आहे, तर रब्बी पिकांसाठी ९१२.३ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचा लक्षांक ठरविण्यात आला आहे. यावर्षी खरीप हंगामात ३१ जुलैअखेर जिल्ह्यातील ८७ हजार ६३९ खातेधारक शेतकऱ्यांना सर्व बँका मिळून ५५२ कोटी ५३ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित झाले.
भंडारा जिल्ह्यातील १२ राष्ट्रीयीकृत बँकांनी ४० टक्के, तर एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ७० टक्के कर्ज वितरण केले आहे. आतापर्यंत लक्षांकाच्या ६३ टक्के कर्ज वितरण झाले आहे. त्यामुळे कर्ज वितरणाची टक्केवारी वाढणार केव्हा, असा प्रश्न आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ व्हावा, खरीप हंगाम सुखकर व्हावा, यासाठी वेळेत पीक कर्ज वाटपाचे आदेश बँकांना असतात.
कर्ज वितरणाचा लक्षांक व टक्केवारी
जिल्ह्यात १२ राष्ट्रीयीकृत बँकांना १७०९१ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. या बँकांनी ७१५० खातेधारक शेतकऱ्यांना ७७७३ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले असून टक्केवारी ४० इतकी आहे. आठ खासगी बँकांना ३८८२ लाख पीक कर्ज वितरणाचा लक्षांक होता. या बँकांनी १०५५ खातेधारकांना १९९१ लाख पीक कर्ज वितरित केले असून, टक्केवारी ४५ आहे. ग्रामीण बँकांना ३५२४ लाख कर्ज वितरणाचा लक्षांक होता. यांनी ३३५८ खातेधारकांना ३४११ लाखांचे कर्ज वितरण केले असून, टक्केवारी ८६ आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५३८१७ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. या बँकेने ७६०७६ खातेधारकांना ४२०७८ लाखांचे कर्ज वितरण केले असून, टक्केवारी ७० आहे.
परंतु, बऱ्याचदा थकीत असलेल्या पीक कर्जाची परतफेड न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित राहावे लागते, तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून दरवर्षी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १० टक्के अतिरिक्त पीक कर्जाचे वितरण केले जाते. सहकारी बँकांत मात्र बँकेने ठरवून वितरण होत असते. सहकारी बैंकासुद्धा दरवर्षी पीक कर्ज वितरणात वाढ करीत असल्याचे दिसून येते. खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या दरम्यान खते, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून पैशाची जुळवाजुळव करण्यात येते. त्याच उद्देशाने सरकारच्या माध्यमातून विविध बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे दरवर्षी वितरण करण्यात येते.
ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंतपीक कर्ज घेतले नसेल, त्यांनी बँकेशी संपर्क साधावा. कागदपत्रांची पूर्तता करावी. गतवर्षी कर्ज घेतलेल्यांनी यावर्षी नूतनीकरण करावे. यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांकडून १० टक्के वाढीव कर्ज दिले जाते. - गणेश तईकर, व्यवस्थापक, अग्रणी बँक, भंडारा.
वेळेत व्हावे पीक कर्जाचे वितरणखरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाची सुविधा करण्यात आलेली आहे. मात्र, खरीप हंगाम सुरू होऊनही वेळेवर पीक कर्ज वितरण होत नाही. साधारणतः मे अखेरपासून पीक कर्ज वितरणाला गती दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मागील वर्षी खरीप हंगामात ८६१३३ शेतकऱ्यांना ५०४.३० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरण झाले होते. कर्ज वितरणाची टक्केवारी ७१ टक्के होती. यावर्षी आतापर्यंत केवळ ६३ टक्के पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्ज वितरणाचे प्रमाण सुमारे ८ टक्के कमी असल्याचे दिसून येते.