गडचिरोली : विविध कार्यक्रमात फुलांचा वापर वाढला आहे. त्यामुळे फुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे फुलशेती फायद्याची ठरत आहे. बाजारातही फुलांना मोठी मागणी असल्याने शेवंती, झेंडूची शेती आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. वैरागड येथील काही शेतकरी फुलशेतीत कमी उत्पादन खर्चात जास्त नफा मिळवत आहेत.
मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान फुलशेतीसाठी पोषक असते. वैरागड येथील माळी समाजबांधव आता भाजीपाला शेतीबरोबर फुलाची शेतीदेखील करीत आहेत. बाजारात फुलांना चांगली मागणी मिळत असल्याने आता फुलशेतीही इतर पारंपरिक शेतीपेक्षा नफ्याची ठरत आहे. लग्न समारंभात फुलांचा वापर होत असल्याने फुलांची मागणी वाढली आहे. बाजारात फुलांना १५० ते १८० रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळत आहे. फुलविक्रेते व्यापारी
शेतीच्या बांधावरच फुलांची खरेदी करीत असल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना थोड्या कमी भावात फुलांची विक्री करावी लागली तरीही फुलशेती आर्थिक सुबत्ता मिळवून देणारी ठरत आहे. तालुका कृषी कार्यालय आरमोरीचे मंडळ कृषी अधिकारी ज्योत्स्ना घरत, कृषी पर्यवेक्षक व्ही. एम. शेंडे, कृषी सहायक के. बी. मडकाम हे वैरागड येथील शेतकऱ्यांना फुलांची शेती करण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत.
भात किंवा भाजीपाला पिकाला लागवड, ओलीत, खते हा खर्च जास्त असतो. तसा फुलशेतीला नाही. उत्पन्न खर्च कमी आणि बऱ्यापैकी नफा फुलशेतीत असल्याने आणि दहा-बारा वर्षापासून फुलाची शेती करीत आहे. विशेषकरून उन्हाळ्यात शेवंतीच्या फुलांची मागणी वाढते. त्यामुळे या कालावधीत फुलांची शेती फायद्याची ठरते. अनेक वर्षांपासून मी फुलांची शेती करीत आहे.
- सुरेश खंडारकर, शेतकरी, वैरागड
शेतकऱ्यांनी झेंडू, शेवंती या फुलशेतीबरोबर गुलाब, मोगरा या फुलांची शेती करावी. चांगल्या दर्जाची फुले असल्यास या फुलांना चांगला भाव मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळण्याची गरज आहे. गडचिरोली जिल्ह्यात आता सिंचनाच्या सुविधा वाढत आहेत. शेतकऱ्यांनी फूल व इतर नगदी पिकांच्या लागवडीकडे वळावे.
- नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी