Join us

Bajari Sowing : शेतकऱ्यांनो! बाजरी आणि मका पेरणी कधी आणि कशी करावी? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 8:28 PM

Bajari Sowing : शेतकऱ्यांनी पावसाचा (Rain) अंदाज लक्षात घेऊन बाजरी आणि मका पिकाची पेरणी करणे क्रमप्राप्त आहे.

Crop Management : नाशिक जिल्ह्यात (Nashik) काही प्रमाणात पाऊस होत असून अनेक भागात खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची पेरणी सुरु आहे. यात भात पिकासह अन्य पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसातच लागवड सुरु होईल. जून महिना संपत आला असून आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पावसाचा (Rain) अंदाज लक्षात घेऊन बाजरी आणि मका पिकाची पेरणी करणे क्रमप्राप्त आहे. या दोन्ही पिकांची पेरणी करण्यापूर्वी काय तयारी करावी? हे समजून घेऊया.... 

बाजरी पेरणी व्यवस्थापन 

नाशिक जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पाऊस व पावसाचा अंदाज लक्षात घेता वापश्यावर (६५ ते १०० मी.मी. पाऊस) बीजप्रक्रिया करून बाजरी पिकाची पेरणी सुरु करावी. शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा देऊन तसेच जीवाणु संवर्धकाची बीज प्रक्रिया करून पिकाच्या अंतरानुसार १५ जून ते १५ जुलै दरम्यान पुरेसा पाऊस झाल्यानंतर (६५ ते १०० मी.मी.) वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी.

खरीप हंगामात पेरणी सरी-वरंबा (थेंब थेंब संचय पद्धत) किंवा सपाट वाफे पद्धतीने करावी. पेरणी २ ते ३ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये. पेरणीचे अंतर कोरडवाहू क्षेत्रात दोन ओळीत ४५ सें.मी आणि दोन रोपामध्ये १५ सें.मी. अंतर ठेवावे, नियमित पावसाच्या ठिकाणी अथवा पाण्याची सोय असेल तेथे ३० x १५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी. त्याकरिता बियाणे प्रमाण ३-४ किलो प्रती हेक्टरी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. 

मका पेरणी व्यवस्थापन 

नाशिक जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसाचा अंदाज लक्षात घेताघेता वापश्यावर (६५ ते १०० मी.मी. पाऊस) बीजप्रक्रिया करून मका पिकाची पेरणी सुरु करावी. खरीप हंगामात मक्याची पेरणी १५ जून ते १५ जुलै दरम्यान पेरणीयोग्य पाऊस (७/५ ते १०० मिमी) झाल्यानंतर लगेच करावी. पेरणीस उशीर झाल्यास, खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. परिणामी रोपांची संख्या घटते व उत्पादन कमी मिळते.

खरीप हंगामात पेरणी सपाट वाफ्यांमध्ये करावी. पेरणीचे अंतर उशिरा व मध्यम कालावधी असणाऱ्या जातींसाठी ७५ x २० सें. मी तर लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी ६० x २० सें.मी ठेवावे. पेरणी टोकण पद्धतीने ४ ते ५ सें.मी खोलीवर करावी. अॅट्राटॉप ५० टक्के हेक्टरी २.५ किलो पेरणी संपताच जमिनीवर फवारावे. (पावसाची उघडीप असताना फवारणी करावी. मका पिकाची पेरणी टोकन पद्धतीने करावी त्याकरिता बियाणे प्रमाण १५-२० किलो प्रती हेक्टरी वापरावे. 

संकलन : विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी (हा कृषी सल्ला केवळ नाशिक जिल्ह्यापुरता दिलेला आहे)

टॅग्स :पेरणीमकाशेतीपीक व्यवस्थापन