जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त म्हणून ओळखले जाणारे ब्राह्मणशेवगे हे गाव आता टंचाईमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. काही वर्षांपूर्वी तालुक्यातील ब्राम्हणशेवगे गावाची ओळख दुष्काळ ग्रस्त गाव म्हणून होती. परंतु आजच्या घडीला पाणीदार गाव म्हणून ब्राह्मणशेवगे ओळखले जातं आहे. योजनांच्या कामासह गावकऱ्यांनी टंचाई काळातही गेल्या ४ ते ५ वर्षांत तब्बल २५ हजार झाडे लावून ती जगविल्याने हे गाव हिरवेगार झाले आहे.
ब्राह्मणशेवगे गावचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतीसोबतच पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय आहे. तर शेतीमध्ये मुख्य पिक कपाशी असून बाजरी, ज्वारी, मका, कडधान्य इ.पिकही शेतकरी शेतात घेतात. मात्र अनेकदा गावातील मंडळी ऊसतोडणीसाठी बाहेरगावी स्थलांतर करत असतात. तशी गावाची ओळख दुष्काळग्रस्त गाव म्हणून होती. मात्र सन 2016 ते 2019 या चार वर्षात भीषण दुष्काळी परिस्थिती गावाने अनुभवली. या गावालाच नाईकनगर १, नाईकनगर २ असे मोठे दोन तांडे जोडले असून या गावाची लोकसंख्या जवळपास पाच हजारांपर्यंत आहे. दरवर्षी येथे भीषण पाणीटंचाई असते. मात्र, गावातील ही दुष्काळी स्थिती दूर करण्यासाठी सारे गाव एकवटले आहे.
जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गावातील ड्रेनेज सिस्टीमचे खोलीकरण, रुंदीकरण आणि गाळ काढण्यात आला आहे, तर गावाखाली तलाव बांधण्यात आला आहे. पाण्याचे साठे निर्माण करून हजारो घनमीटरचे काम झाले आहे. निसर्ग टेकडी प्रकल्पात पर्यावरण आणि जलसंधारणाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचे काम चालू आहे. याशिवाय ओसाड, मुरमाड टेकडी परिसरात वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षण करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभाग, सीसीटीचे नियोजन आणि लोकसहभागाने पहिल्या वर्षी 25,000 झाडे लावण्यास मदत केली आहे, ज्यामुळे परिसराची भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारली आहे.
लोकसहभागातून २५ हजार झाडे जगवली!
गावात आतापर्यंत २५ हजार झाडे लोकसहभागातून लावली असून त्यांचे संगोपनही केले जात आहे. दरवर्षी ठिकठिकाणी झाडे लावली जातात. दररोज टँकरने पाणीपुरवठा करून ही झाडे जगवली आहेत. जलजीवन मिशन' अंतर्गत स्वतंत्र ब्राह्मणशेवणे व नाईकनगरसाठी दोन टाक्यांचे काम सुरू आहे. गावात संपूर्ण नवीन पाइपलाइन पूर्ण झालेली आहे. गिरणा धरणावरून पाणीपुरवठा होणे एवढेच बाकी राहिलेले आहे. कदाचित येणारे वर्ष या गावाचे पाणीटंचाईचे शेवटचे वर्ष असू शकते. तर जलसंधारणाअंतर्गत शेतीला पाणी देण्यासाठी व गाव दुष्काळातून मुक्त करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी लोकसहभाग लाभत आहे, अशी माहिती भूजल वारकरी व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांनी दिली.