गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलप्रभावित व दुर्गम भागात असलेल्या उदयनगर येथील जि. प. बांग्ला प्राथमिक शाळेत (Gadchiroli ZP School) परसबाग लागवडीचा उपक्रम यशस्वी झाला आहे. जवळपास ८१ प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करण्यात आली असून या शाळेला राज्यस्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. विशेषतः कुपोषणाची समस्या असलेल्या जिल्ह्यात शाळेतील परसबाग (Parasbag) महत्वाचे काम करत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli District) मुलचेरा तालुक्यात बंगालीबहुल नागरिकांची वस्ती आहे. यामुळे बहुतांश शाळा या बंगाली माध्यमाच्या आहेत. येथील विद्यार्थ्यांना बंगाली भाषेतून शिक्षण मिळते. त्यापैकीच उदयनगरची बांग्ला प्राथमिक शाळा आहे. येथील पटसंख्या २१ आहे. मुख्याध्यापक दीपक मंडल हे या शाळेत २०१७ रोजी रुजू झाले. तेव्हा शाळेचे मागील बाजूचे पटांगण झाडाझुडपांनी वेढलेले होते. कुटुंबातूनच भाजीपाला लागवडीचे धडे घेतलेल्या मंडल यांना शाळेत परसबाग निर्मितीची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी बुलडोझारद्वारे मैदानाचे सपाटीकरण केले. त्यानंतर गावातील नागरिकांच्या मदतीने विविध प्रकारचा फळभाज्या, पालेभाज्या, तसेच फळझाडे व अन्य भाज्यांची लागवड केली.
दरम्यान, केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्माण करून या परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश १५ ऑक्टोबर २०१९ रोजी शाळांना प्राप्त झाले. त्यानुषंगाने उदयनगर येथे विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करून विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आहाराचा लाभ देण्यात येत आहे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळत आहे. ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक, सेंद्रिय भाजीपाला, सकस आहार, मिळत आहे. तसेच फळे तसेच औषधी वनस्पतीची लागवड केली आहे.
कुपोषणावर चांगला पर्याय
चंद्रपूर जिल्ह्यात कुपोषणाची समस्या असतानाच शाळांमध्ये परसबाग लागवड करून तेथील भाजीपाल्याचा वापर मुलांच्या आहारात करणे ही चांगली संकल्पना आहे. या संकल्पनेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्राथमिक शाळांमधूनच पोषण होईल. शासनाची ही संकल्पना जराशी उशिरा अंमलात आली असली तरी जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये परसबाग लागवडीचा उपक्रम सात-आठ किंवा त्यापूर्वीपासूनच राबविला जात आहे. उदयनगर जि.प बांग्ला शाळेने तर पोषणाच्या दृष्टीने आवश्यक असलेला सर्वच प्रकारचा भाजीपाला व फळभाज्यांची लागवड करून तालुका, जिल्हा आणि आता राज्यस्तरावर नावलौकिक मिळविला.
८१ प्रकारच्या भाजीपाला, वनस्पतीची लागवड
औषधी वनस्पती, फळझाडे, वेलवर्गीय वनस्पती उदयनगरच्या परसबागेत निंब, तुळस, गिलोय, हिरडा, पुदीना, पाथरचट्टा, खानकुनी, एलोवेरा, फिलफूल, पिपुली, आदी औषधी वनस्पती, तसेच वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी, बटाटे, मेटे आलू, पानकोबी, फुलकोबी, गाजर, लालवीट, लसूण, नवलगोल, खरबुज, कांदा, राई, पाढराळ, तसेच केळी, पपई, लिंबू, काजू, बदाम, फणस, आंबा, पेरू, जांभूळ, सीताफळ आदींसह एकूण ८१ प्रकारचा भाजीपाला, वनस्पती व फळझाडांची लागवड केली आहे.