धुळे : यंदा पावसाचे प्रमाण असल्याने सद्यस्थितीत विहिरी, नाले कोरडेठाक झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बेहेड- विटाई या परिसरातील शेतकरी विशाल खैरनार यांनी टँकरच्या पाण्यावर कलिंगडाची शेती केली. यामुळे त्यांना तब्बल ८० टक्के उत्पादन झाले आहे.
साक्री तालुक्यातील काटवान भागातील बेहेड विटाई या परिसरातील शेतकरी विशाल खैरनार यांनी बेहेड शिवारातील साडेतीन एकर शेतात फेब्रुवारी महिन्यात कलिंगडाच्या - तीन वाणांची लागवड केली होती: मात्र लागवड केल्यानंतर महिनाभरात त्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला; मात्र खैरनार यांनी खचून न जाता पिकाला टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतला. एक ते दीड महिना टँकरने पाणी देणे ही बाब अतिशय कठीण होती; मात्र तरीही त्यांनी सुमारे ३८० टँकर्स पाणी पिकाला दिले. ही बाब कुठल्याही सामान्य शेतकऱ्यांसाठी आवाक्याबाहेर होती. तरीदेखील खैरनार यांनी उत्कृष्ट नियोजन करून साडेतीन एकरामध्ये कलिंगडाचे ८० टन उत्पादन मिळवले.
दरम्यान सात ते आठ किलोचे एक फळ सरासरी पिकवण्यात त्यांना यश आले. या ८० टन उत्पादन केलेल्या मालाला बाजारभाव हा सरासरी केवळ १५ ते २० रूपय प्रतिकिलो मिळाला होता. त्यात टँकरने पाणी टाकण्याचा खर्च दोन लाख रुपये आला होता. तसेच औषधे आणि खतांसह तीन लाख रुपये खर्ची कलिंगडावर करण्यात आला होता, त्यातून त्यांना एकूण उत्पन्न हे आठ लाख ४० हजार रुपयांचे मिळाले. म्हणजेच सर्व खर्च काढून एकरी एक लाख रुपये फायदा मिळाला.
पाण्याअभावी नफ्यात दोन लाखांची घट
दोन लाख रुपयांचे पाणी लागल्यामुळे त्यांच्या निव्वळ नफ्यात दोन लाखांची घट झाली आहे. हेच पाणी त्यांच्या विहिरीत राहिले असते, तर त्यांना दोन लाख रुपये अधिक नफा मिळाला असता, त्यामुळे भविष्यात साक्री तालुक्यातील काटवान भागात शासनाने सिंचनाचे प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याचा सूर शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. मुळात यंदा सर्वदूर पाणीटंचाई समस्या असल्याने अनेक भागात शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे. म्हणूंनच या शेतकऱ्याने थेट टँकरच्या साहाय्याने शेतीसाठी पाणी उपलब्ध करत शेती फुलवली आहे.