Dada Lad Cotton Technology :कापूस उत्पादक (Cotton Farmers) शेतकऱ्यांसाठी शासनाने दादा लाड कापूस तंत्रज्ञानाची (Dada Lad Cotton Technology) पद्धत विकसित केली असून, दोन वर्षांपासून धुळे जिल्ह्यातील (Dhule District) मालपुरसह परिसरातील शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस पिकाची लागवड करीत आहेत. या परिसरात हा कापूस लागवडीचा प्रयोग यशस्वी होऊन, शेतकऱ्यांचे उत्पन्ननही दुपटीने वाढले आहे.
गुरुवारी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने तंत्र अधिकारी, कापूस विकास निर्देशालय नागपूरच्या डॉ. दिव्या सहारिया यांनी प्रत्यक्षात या कापूस लागवडीच्या शेतात जाऊन कपाशीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना शेतीतून विकास साधून आपले जीवनमान उंचवायचे असेल, तर प्रत्येक शेतकऱ्याने दादा लाड कापूस तंत्रज्ञान आत्मसात करून, त्या पद्धतीने कापसाची लागवड करण्याचे आवाहनही केले.
धुळे जिल्ह्यातील मालपूरसह परिसरातील गावात दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी दादा लाड कापूस लागवड पद्धत निवडली आहे. या कापसाच्या क्षेत्रफळावर गुरुवारी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने तंत्र अधिकारी, कापूस विकास निर्देशालय नागपूरच्या डॉ. दिव्या सहारिया यांनी जाऊन दादा लाड कापूस लागवडीची पाहणी केली. यावेळी डॉ. दिव्या सहारिया यांनी प्रत्यक्ष पारंपरिक पध्दतीने येथील कापूस लागवड पद्धतीची पाहणी केली. यात दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान यात मोठा फरक दिसून आल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
शेतकरी नंदलाल पाकळे म्हणाले की, यावर्षी पासून ही पद्धत वापरली असून फळफांदी व गळफांदीची छाटनी केल्यामुळे कापसाच्या झाडावर बोंडाचे प्रमाण यावर्षी तुलनेने जास्त आहे. यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. तर शेतकरी दामोदर माळी म्हणाले कि, वर्षापासून दादा लाड कापुस लागवडीचा वापर करून कापसाचे उत्पादन घेत आहे. यामुळे दुप्पटीने उत्पादनात वाढ झाली आहे. बोंडाचा आकार मोठा होऊन, वजनात देखील वाढ होते.
काय आहे दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान
तीन बाय एक अंतरावर कापसाची लागवड करावी. साधारण दोन महिन्यांचा कापूस झाल्यावर फळफांदी व गळफांदी ओळखून गळफांदीची छाटणी करावी. कमरे एवढा कापूस झाल्यावर त्यांचा शेंडा खुडावा. यामुळे अनावश्यक जीवनसत्वे वाया न जाता कापूस झाड पोसले जाते. तसेच बोंडाचे आकार वाढून त्यातील सरकीचे प्रमाण वाढते तसेच वजनात देखील वाढ होते. अंतर कमी झाल्याने क्षेत्रफळात झाडांची संख्या वाढून उत्पादन दुप्पटीने वाढते.
हे ही वाचा : Rabbi Crop Management : रब्बी पिकांचं उत्पादन वाढवायचं, 'ही' पंचसूत्री लक्षात ठेवा!