सोलापूर : यंदा पाऊस बेताचा पडल्याने रब्बी पेरणीही बेताचीच झाली आहे. गहू, हरभरा व ज्वारीची पेरणी सरासरी इतक्या क्षेत्रावर होऊ शकली नाही. मात्र, जिल्ह्यात पशुधन मोठ्या प्रमाणावर असल्याने मका सरासरीच्या सव्वाशे टक्के क्षेत्रावर झाल्याचे दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतकरी स्वतःहून ज्वारीची पेरणी करतात. मात्र, मागील दोन-तीन वर्षांत ज्वारीला बाजारात म्हणावा तितका दर मिळत नसल्याने शिवाय काढणीला म्हणेल तितके पैसे देऊनही मजूर मिळत नाहीत. ज्वारी पेरणी ते काढणीसाठी होणारा खर्चही निघत नसल्याने मागील वर्षापर्यंत ज्वारी पेरणी क्षेत्रात वरचेवर घट होताना दिसत होती. मात्र, प्रक्रियेतून ज्वारीपासून बिस्किटे, पोहे व इतर खाद्यपदार्थ बनवू लागले आहेत: याशिवाय ज्वारीचा उपयोग आता इथेनॉल तयार करण्यासाठीही होणार आहे. त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर ज्वारी पेरणी होईल असा कृषी खात्याचा अंदाज होता. मात्र, यंदा पाऊस कमी पडल्याने व परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने ज्वारीच्या पेरणीने सरासरीही गाठली नाही. हीच स्थिती गहू व हरभऱ्याची आहे.
ज्वारी, हरभरा व गव्हाची पेरणी जवळपास 81-82 टक्के क्षेत्रावर झाली आहे. मात्र, जनावरांच्य चाऱ्यासाठी उपयोगी ठरत असलेल्या मक्याची पेरणी सव्वाशे टक्क्यांपर्यंता झाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने म्हणाले की, यावर्षी पाऊस सरासरीच्या 76 टक्के इतकाच पडला. पाऊस कमी पडल्याने रब्बी पेरणी करता आली नाही. उशिरापर्यंत ज्वारी, हरभरा व गहू पेरणी केली. सुरुवातीला पेरणी केलेली पिके जोमात आहेत. उशिराने पेरणी केलेल्या ज्वारी, हरभरा व गव्हाचे पीक पाण्यावर अवलंबून आहे.
ज्वारी चांगली .. गव्हाची वाढ होईना..
कमी पाऊस असला तरी ज्वारीची वाढ जोमात होत आहे. मात्र, जिल्ह्यात गव्हाच्या पिकाची उंची म्हणावी तितकी वाढताना दिसत नाही. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…