धुळे : चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यात 'लम्पी' या संसर्गजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले होते. धुळे जिल्ह्यातील 52 गावांमध्ये 1500 पेक्षा अधिक गुरे बाधित झाली होती. त्यापैकी 81 जनावरांचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या एक ते दीड महिन्यापासून जिल्ह्यात 'लम्पी'चा प्रादुर्भाव असलेले एकही जनावर आढळून आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गुरांची 'लम्पी'पासून मुक्ती झाली आहे. असे असले तरी पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
लम्पी हा गोवंशीय जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असलेले विषाणू हे देवी विषाणू गटातील कॅप्रिल्पॉक्स या प्रवर्गात मोडतात. जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. जिल्ह्यात 26 जुलै 2022 रोजी लम्पीचा शिरकाव झाला होता. सुरुवातीला फक्त धुळे तालुक्यातील जनावरांमध्येच या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला होता. मात्र, नंतर या संसर्गजन्य आजाराने जिल्ह्यात हातपाय पसरवले होते. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जवळपास 2700 जनावरांना लम्पी हा संसर्गजन्य आजार झालेला होता. मात्र, वेळीच या जनावरांवर उपचार करण्यात आल्याने, 2588 जनावरे लम्पीतून मुक्त झाली होती, तर लम्पीमुळे जिल्ह्यात 131 जनावरांचा मृत्यू झाला होता. यात गायी 43 बैल 70 व 18 वासरांचा समावेश आहे.
दरम्यान, चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पीचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत होता. लम्पीचा प्रादुर्भाव जाणवताच पशुसंवर्धन विभागातर्फे बाधित गुरांचे विलगीकरण करणे, लसीकरण करणे आदी उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आले. असे असले तरी दुसऱ्या टप्प्यात 81 गुरांचा 'लम्पी'मुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात लम्पीचा आजार नियंत्रणात आलेला आहे. गेल्या एक-दीड महिन्यापासून लम्पीचा प्रादुर्भाव असलेले एकही जनावर आढळून आलेले नाही. जिल्ह्यात गुरांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहा. आयुक्त डॉ. मिलिंद भणगे यांनी दिली आहे.
64 पशुपालकांना अनुदान
लम्पीमुळे मृत झालेल्या पशुपालकांना अनुदान देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार प्रस्ताव मागविण्यात आले होते. यात गायीसाठी 30 हजार, बेलासाठी 25 हजार, तर वासरू मयत झाल्यास त्यासाठी 16 हजार याप्रमाणे आतापर्यंत 64 पशुपालकांना 13 लाख 53 हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित पशुपालकांनाही नियमानुसार अनुदान देण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.