नाशिक : नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी पर्यटन संचालनालयाने द्राक्ष विक्रीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या 24 व 25 फेब्रुवारी 2024 नाशिकमध्ये द्राक्ष विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना द्राक्ष विक्री करावयाची असल्यास त्यांनी पर्यटन संचालनालय विभागाशी संपर्क वाढूं नाव नोंदणी करावी तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पर्यटन विभागाकडून करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती केली जाते. यंदा मात्र इस्रायल युद्धामुळे द्राक्ष निर्यातीला काहीशी अडचण आली असून लांबच्या पल्ल्याने निर्यात केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प दरात द्राक्ष विक्री करावी लागत आहे. मात्र नाशिक पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रेप हार्वेस्ट महोत्सवाच्या माध्यमातून ताजी द्राक्ष खरेदी करण्यासह द्राक्ष बागांना भेटी देवून काही प्रसिद्ध वायनरीना भेट देता येणार आहे. येत्या 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी ग्रेप हार्वेस्ट महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका मधुमती सरदेसाई यांनी केले आहे.
दरम्यान या ग्रेप हार्वेस्ट महोत्सवात द्राक्ष शेती, द्राक्ष हार्वेस्टिंग (काढणे), द्राक्षांच्या विविध जाती, आधुनिक पद्धतीने द्राक्ष व्यवस्थापन तसेच पॅकेजिंग बघता येणार आहे. यासोबत द्राक्षावर प्रोसेसिंग करून तयार केलेले विविध पेय व विविध खाद्य पदार्थ चाखण्याची संधी देखील यावेळी मिळणार आहे. द्राक्ष खरेदीसह आकर्षक खेळ आणि लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचेही आयोजन करण्यात आले आहे. टूर नंबर १: २४ फेब्रुवारी २०२४ : हॉटेल एमराल्ड पार्क (एकत्रीकरण) सुरूवात सकाळी ८ वाजता बसवंत हनी बी पार्क (निसर्ग उत्सव), लोणवाडी - चोपडे ग्रेप पॅकिंग हाऊस, निफा वायनरी टूर (कृषी पर्यटन केंद्र / हार्वेस्टिंग)
इथं साधा संपर्क
टूर नंबर २ : २५ फेब्रुवारी २०२४ : हॉटेल एमराल्ड पार्क (एकत्रीकरण) सुरूवात स. ८ वाजता सह्याद्री फार्म (फार्मर प्रोड्युसर कंपनी)- ऍग्रो प्रोसेसिंग युनिट - मोएत शेंदोन विनयार्ड टूर महोत्सवासंबंधी अधिक माहितीसाठी ९८९००१११२०, ०९८९०४०४२५३, ९८२२४३९०५१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर व ddtourism.nashik-mh@gov.in या ईमेल आणि www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.