Join us

Kharif Season : खरिपासाठी जिल्हा बँकेकडून पीक कर्ज, वाचा पीकनिहाय कर्ज तपशील 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 1:22 PM

खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज वितरणास प्रारंभ करण्यात आला आहे.

शेतीचा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यादृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा यांच्याकडून सन २०२४- २०२५ या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज वितरणास २२ एप्रिलपासून प्रारंभ करण्यात आला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पीक कर्ज वाटपाची मुदत आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक कर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता अल्पमुदतीचे बिनव्याजी कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून दिले जाते. सन २०२३-२०२४ या हंगामात उचललेल्या पीक कर्जाची ३१ मार्च २०२४ पर्यंत परतफेड करावी लागते. त्यानंतर नवीन हंगामाकरिता ०१ एप्रिलपासून पीक कर्जाचे वाटप केले जाते. यावर्षी निवडणुकांचा कालावधी असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून २२ एप्रिलपासून शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत वाटप होणार आहे.

चालू हंगामासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने अल्पमुदतीचे पीक कर्जाचे पीकनिहाय कर्ज दरात वाढ करण्याची शिफारस केलेली आहे. त्यानुसार चालू खरीप हंगामासाठी बागायती धान पिकासाठी प्रति एकरी २३ हजार ५०० तर जिरायती शेतीसाठी २० हजार ५०० रुपये यानुसार वितरण होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे १००० रुपये आणि ३०० रुपये अशी प्रतिएकरी वाढ करण्यात आलेली आहे. तूर पिकासाठी बागायती ११ हजार रुपये आणि जिरायती ९ हजार रुपये यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अनुक्रमे ४०० रुपये आणि १००० रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे. सोयाबीनला प्रति एकरी १४,५०० रुपये मिळतील. मागील वर्षीच्या तुलनेत ५०० रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. भुईमूगे प्रति एकरी १० हजार  रुपये असे दर चालू हंगामाकरिता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भंडारा यांनी निश्चित केलेले आहेत.

कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरले नाही

जिल्ह्यातील शेतकरी कर्जदारांना अल्पमुदतीचे पीक कर्ज मध्यवर्ती बँकेकडून वाटपास सुरुवात झालेली आहे. मात्र, अद्यापही जिल्हा बँकेने आपल्या शाखांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले नाही.

थकीत कर्जदारांना पीक कर्जाचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतकरी कर्जदारांनी ३१ मार्च २०२४ पर्यंत मागील हंगामातील कर्जाची रक्कम भरली नसेल, अशा थकीत कर्जदारांना चालू हंगामासाठी पीक कर्ज मिळणार नाही. अशा कर्जदारांकडून १ एप्रिल २०२४ पासून १० टक्के या दराने दर दिवसाच्या प्रमाणात कर्ज रकमेवर व्याजाची आकारणी होईल.

- हेमंत अन्ने, कर्ज विभाग प्रमुख, जिल्हा मध्यवर्ती बँक भंडारा

७/१२ साठी तलाठी कार्यालयांमध्ये गर्दी

नवीन हंगामाकरिता कर्ज मिळण्यासाठी शेतकरी १ एप्रिल- पासून तलाठी कार्यालयामध्ये सातबारा मिळवण्यासाठी चकरा मारत आहेत. परंतु, निवडणुकांमुळे तलाठी व्यस्त असल्याने शेतकऱ्यांना अद्यापही सातबाराचे वाटप करण्यात आलेले नव्हते. सोमवारपासून तलाठी कार्याल- यामध्ये उपस्थित झाल्याने सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे चित्र अनेक कार्यालयांमध्ये दिसून आले.

टॅग्स :शेतीभंडाराशेती क्षेत्रखरीपपीक कर्ज