अमरावती : अमरावती जिल्ह्यात २.७६ लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) लाभ मिळत आहे. मात्र, अजूनही सहा हजार खातेदारांनी बँक खाते आधार लिंक व ई-केवायसी केलेली नाही. महिनाभरात या योजनेचा १७ वा हप्ता वितरित (17 Installment) होण्याची शक्यता आहे. यासाठी १५ जूनपर्यंत डेडलाइन दिली आहे, अन्यथा या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
केंद्राच्या निर्देशानुसार ५ ते १५ जून या कालावधीत लागवडीलायक क्षेत्रधारक असल्याचा पुरावा, बैंक खाते आधार संलग्न व ई-केवायसी करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. लाभार्थीची स्वयंनोंदणी व ई-केवायसी (e KYC) करण्यासाठी राज्यातील सर्व सीएससी सेंटर व आधार संलग्न बैंक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सूचित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.
पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी तीन बाबी महत्त्वाच्या आहेत. यासाठी ५ ते १५ जूनदरम्यान गावागावांत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी यंत्रणेला सहकार्य करावे. - राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक
..तर लाभापासून राहणार वंचित
पीएम किसान योजनेच्या १७ व्या हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई- केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा १७ वा हप्ता वितरणापूर्वी करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा लाभापासून वंचित राहावे लागेल.
या तीन बाबींची पूर्तता अनिवार्य
योजनेच्या लाभासाठी भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील, बैंक खाती आधार संलग्न व ई-केवायसी या बाबींची पूर्तता करावी लागेल. भूमीअभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या लाभार्थीनी संबंधित तलाठी यांच्याकडे संपर्क साधावा, याशिवाय त्यांना ई-केवायसी करण्यासाठी सीएससी सेंट तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत कार्यपूर्तता करावी लागणार आहे.