भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) फळांचे व्यापारी, फळे हाताळणारे, अन्नपदार्थांचे व्यवसायिक (FBOs) तसेच फळे पिकविणाऱ्या केंद्रांचे चालक यांना, विशेषत: आंब्याच्या हंगामात, फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावरील प्रतिबंधाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
सद्यस्थितीत आब्यांचा सिझन सुरु असून विविध प्रकारच्या आब्यांनी बाजार फुलून गेला आहे. अशात आंब्याची ओळख, कृत्रिमरीत्या आणि नैसर्गिक रित्या पिकवलेला आंबा असे दोन्ही आंबे बाजारात असल्याने ग्राहकांची तारांबळ होते. त्यामुळे संबंधित व्यापारी, विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. एफएसएसएआय’ने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा विभागांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे, तसेच अन्नसुरक्षा आणि मानके कायदा, 2006 आणि त्यानुसार बनवलेल्या नियम आणि विनियमांच्या तरतुदींनुसार अशा बेकायदेशीर पद्धतींमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीविरुद्ध (व्यक्तींविरुद्ध) कठोर कारवाई करावी, असे सुचवले आहे.
दरम्यान विविध धोक्यांमुळे, फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर अन्न सुरक्षा आणि मानके (विक्रीवर प्रतिबंध आणि निर्बंध) विनियम, 2011 च्या नियमन 2.3.5 अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या कॅल्शियम कार्बाइडच्या सर्रास वापराचा मुद्दा लक्षात घेऊन, एफएसएसएआय’ने भारतात फळे पिकण्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून इथिलीन वायूचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. इथिलीन वायूचा वापर पीक, विविधता आणि परिपक्वता यावर अवलंबून असून 100 पीपीएम (100 μl/L) पर्यंत त्याचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय, केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती (CIB आणि RC) ने आंबा आणि इतर फळे एकसमान पिकवण्यासाठी इथेफॉन 39% SL ला मान्यता दिली आहे.
काय परिणाम होऊ शकतात?
सामान्यतः आंब्यासारखी फळे पिकवण्यासाठी वापरले जाणारे कॅल्शियम कार्बाइड वातावरणात ॲसिटिलीन वायू सोडते. ॲसिटिलीनमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे हानिकारक अंश असतात. ‘मसाला’ म्हणूनही ओळखले जाणाऱ्या या पदार्थांमुळे चक्कर येणे, वारंवार तहान लागणे, चिडचिड, अशक्तपणा, गिळायला त्रास होणे, उलट्या होणे आणि त्वचेवर फोड येणे इत्यादी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शिवाय, ऍसिटिलीन वायू, तो हाताळणाऱ्यांसाठी देखील तितकाच घातक आहे. कॅल्शियम कार्बाइड वापरताना ते फळांच्या थेट संपर्कात येण्याची तसेच आर्सेनिक आणि फॉस्फरसचे अंश फळांवर शिल्लक राहण्याची शक्यता असते.
इथे आहे मार्गदर्शक सूचना
एफएसएसएआय’ने "फळे कृत्रिमरित्या पिकवण्याची पद्धत - इथिलीन वायु, फळे पिकवण्याचा एक सुरक्षित पर्याय" इथे वाचा मार्गदर्शक पुस्तिका ही मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेतील प्रक्रियेचे अनुसरण करून फळे कृत्रिमरीत्या पिकवावीत, अशी सूचना दिली आहे. तसेच कॅल्शियम कार्बाइडचा वापर किंवा फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी पिकवणारे घटक वापरण्याची कोणतीही चुकीची प्रथा ग्राहकांच्या निदर्शनास आल्यास, अशा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.