Join us

Lokmat Agro Impact : एमआरपीपेक्षा अधिक दराने खतांची विक्री करू नका : प्रधान कृषि सचिव व्ही. राधा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 6:18 PM

Agriculture News : खतांची जादा दराने विक्री केल्याचे आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना प्रधान सचिव (कृषि) व्ही. राधा यांनी दिल्या आहेत.

Agriculture News :खरीप हंगामातील (Kharif Season) लागवडीसाठी शेतकरी खतांची खरेदी करत आहेत. मात्र अशातच काही खत विक्रेते एमआरपीपेक्षा अधिक दराने व्रिक्री करत असल्याने लोकमत ऍग्रोच्या (Lokmat Agro) माध्यमातून निदर्शनास आले. शिवाय खतांसोबत लिक्विड घेण्याची जबरदस्ती देखील केली जात असल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर लागलीच कृषी विभागातील भरारी पथकाकडून संबंधित बाजारपेठेत जात पडताळणी करण्यात आली. तसेच खतांची जादा दराने विक्री अथवा इतर विद्राव्य खतांचे लिंकिंग केल्याचे आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्याच्या सूचना प्रधान सचिव (कृषि) व्ही. राधा (V Radha) यांनी कृषि विभाग व जिल्ह्यातील कृषि निविष्ठा संघास दिल्या आहेत. 

नाशिक तालुका (Nashik Taluka) परिसरात युरियासोबत लिक्विड खते व इतर खते लिंकिंगमध्ये दिले जात असल्याचे लोकमत ऍग्रो ने समोर आणले होते. या बातमीच्या अनुषंगाने नाशिक तालुका मधील गिरणारे परिसरात भरारी पथकामार्फत एकूण ५ खत विक्री केंद्रांची खत निरीक्षकांनी तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालामधील त्रुटीच्या अनुषंगाने पूर्तता करणेबाबत संबंधित खत विक्रेत्यांना तपासणी टिपणी बजावण्यात आलेली आहे.

याउलट नाशिक जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक दर्जेदार बियाणे, खते व औषधे उपलब्ध करून द्यावीत. त्याचप्रमाणे खतांची जादा दराने विक्री अथवा इतर विद्राव्य खतांचे लिंकिंग केल्याचे आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्याच्या सूचना प्रधान सचिव (कृषि) व्ही. राधा यांनी कृषि विभाग व जिल्ह्यातील कृषि निविष्ठा संघास दिल्या. 

नाशिक तालुक्यामध्ये ८०५ मे.टन युरिया खत किरकोळ खत विक्रेत्यांकडे उपलब्ध असून गिरणारे परिसरात एकूण ७ अनुदानित खत विक्रेते असून त्यापैकी ४ खत विक्रेत्यांकडे १६.२१ मे.टन युरिया उपलब्ध आहे. शिल्लक असलेला युरिया कृषी विभागातील अधिकारी कर्मचायांचे उपस्थितीत समक्ष शेतकऱ्यांना विक्री करण्याबाबतचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच शेतकर्यांचे मागणी नुसार अतिरक्त युरिया (संरक्षित खत साठ्यातून व येणाऱ्या खत रेक मधून) उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व खत निरीक्षक यांना जादा दर तसेच खत लिंकिंग बाबत कार्यद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

शेतकरी योजनांसाठी अतिरिक्त शुल्क आकारू नये.... 

कृषि विभागाच्या विविध योजनांचा ऑनलाईन पध्दतीने लाभ घेण्याच्या माध्यमातून शेतकरी अर्ज करीत असतात. जिल्ह्यामध्ये १ रुपया पीक विमा करिता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी योजनेत सहभागी होत आहे. अशा परिस्थितीत सामाईक सूविधा केंद्रात गर्दी होते व त्याचाच गैरफायदा म्हणून शेतकऱ्याकडून अतिरीक्त शुल्क आकारण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर तातडीने कृषि विभागाने संबंधित सामाईक सूविधा केंद्रावर प्रशासनाच्या माध्यमातून निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :खतेनाशिकशेतीखरीपशेती क्षेत्र