Join us

Dragon Fruit Farming : धानाच्या पट्ट्यात ड्रॅगन फ्रुट शेती, गोंदियातील शेतकऱ्याने १० एकरात फुलविली ड्रॅगनफ्रूटची बाग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 2:04 PM

Dragon Fruit Farming : गोंदिया तालुक्यातील मजीतपूर येथील शेतकऱ्याने १० एकरावर ड्रॅगन फ्रूट लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकरी धानाच्या शेतीला (Paddy Farming) फाटा देत नवनवीन प्रयोग करीत आहेत. काही शेतकरी फळबाग व ऊस लागवडीकडे सुद्धा वळत आहेत. गोंदिया तालुक्यातील मजीतपूर येथील एका शेतकऱ्याने १० एकरावर ड्रॅगन फ्रूट लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यात ते यशस्वी झाले असून भरघोस उत्पन्न देखील घेत इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. 

भालचंद्र ठाकूर असे त्या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव (Gondia District) आहे. त्यांनी धानाच्या पट्ट्यात सर्वसामान्य नागरिकांना ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit Farming) खाता यावे, यासाठी ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती केलीय. ठाकूर यांनी त्यातून लाखो रुपयांचा नफा सुद्धा कमावला आहे. परदेशात पिकणाऱ्या फळांची लागवड आपल्या देशात करून  त्याचे उत्पादन घेणे तसे आव्हानात्मक असते. जैविक शेतीच्या क्षेत्रात अग्रेसर राहणारे कृषी व्यावसायिक शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी परदेशी फळाच्या शेतीचा प्रयोग आपल्या १० एकर शेतात केला. ते फळ म्हणजे ड्रॅगन फ्रूट होय. 

थायलंड, व्हिएतनाम व श्रीलंकेसारख्या देशात या फळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील तीन-चार वर्षांपासून या फळाची भारतात लागवड केली जात आहे. ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) हे तसे श्रीमंतांचे फळ म्हणून ओळखले जाते. गोंदिया जिल्ह्याची भाताचे कोठार म्हणून सर्वदूर ओळख असून धान पीक येथील शेतकऱ्यांचे मुख्य आहे; मात्र गोंदियातील प्रगतिशील भालचंद्र ठाकूर यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.

धानापेक्षा लागेल कमी पाणी धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे येथील शेतकरी कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाच्या सावटात सापडतो. तेव्हा ड्रॅगन फ्रूट हा अतिशय कमी पाणी आणि कमी कालावधीत विकसित केलेली फळाची जात आहे. त्यामुळे कमी पाणी कमी खर्चात ड्रॅगन फ्रूटची बाग फुलविली आणि सर्वसामान्य नागरिकांना हे फळ कमी खर्चात खाता यावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं भालचंद्र ठाकूर यांनी सांगितलं.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीगोंदियाफळेफलोत्पादन