नाशिक : एकीकडे द्राक्षांचे पैसे न देता द्राक्ष माल घेऊन पलायन करण्याच्या घटना घडत आहेत. आता दुसरीकडे चोरट्यांनी द्राक्षबागेकडे (Grape Stolen) मोर्चा वळवत चक्क ७० ते ८० क्विंटल द्राक्षांची चोरी केल्याची घटना निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथे घडली आहे. द्राक्षबागांवर चोरट्यांचा धाडसी डल्ला होऊ लागला आहे.
राहुल वामनराव भोसले व जितेंद्र अशोकराव भोसले या दोन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेतून (Grape Farming) चोरट्यांनी अंदाजे ७० ते ८० क्विंटल द्राक्ष चोरून नेल्याने द्राक्ष उत्पादकाला साडेचार ते पाच लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. या द्राक्ष चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेत कठोर कारवाई करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape Farmers) करत आहेत. द्राक्ष उत्पादकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे घड कुजून गेली आणि उत्पादनात मोठी घट झाली. त्यातच वाढलेल्या तापमानामुळे "सनबर्न"चा फटका बसला. यामुळे आधीच घटलेल्या उत्पादनावर व्यापाऱ्यांनी पैसे न देता पलायन करणे, आता सुरू झालेली चोरी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
तत्काळ पावले उचलणे गरजेचे
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाने तत्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. नियमित गस्त, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था आणि चोख बंदोबस्त यामुळे या चोरीच्या घटनांना आळा घालता येईल. अशी मागणी केली जात आहे.
रात्रभर शेतकऱ्यांवर जागरणाची वेळ
द्राक्ष चोरीला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांना आता रात्रीच्या वेळी बागेत जागरण करावी लागत आहे. काही उत्पादकांनी आपल्या बागांमध्ये लाईटची व्यवस्था केली आहे, तर काही शेतकरी स्वतः रात्रभर बागेत ठाण मांडून बसत आहेत. परिणामी शेतकरी चिंतेत सापडला आहे.