सध्या मोहफूल वेचणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी व मजूर वर्ग जिवावर उदार होऊन काळोख्या अंधारात पहाटेच्या सुमारास शेतशिवारात व जंगलव्याप्त परिसरात असलेल्या झाडांची मोहफुले मोठ्या कष्टाने गोळा करीत आहेत. मात्र मार्च महिन्यापासून वेळोवेळी बदलणाऱ्या हवामानामुळे मोहफुलांना आवश्यक असे पोषक वातावरण मिळत नसल्यामुळे यंदा उत्पादन घटले आहे.
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्टा असलेल्या त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आदी तालुक्यात मोठ्या मोहफुलांचे संवर्धन केले जाते. या परिसरात हिरव्यागार वनराईने नटलेल्या जंगलात बहुगुणी व कल्पवृक्ष म्हणून ओळखली जाणारी लहान मोठी मोहवृक्षांची असंख्य झाडे आहेत. वसंत ऋतूमध्ये मोहवृक्षाला मोठ्या प्रमाणात कळ्या येऊन त्यांची फुले होऊन उष्णतेमुळे जमिनीवर गळून पडतात. या मोहफूल संकलनाच्या माध्यमातून दरवर्षीच उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक गोरगरीब कुटुंबांना जवळपास एक ते दीड महिना हंगामी रोजगाराची संधी उपलब्ध होत असते. या संधीतूनच वाढत्या महागाईच्या काळात मोठा आधार मिळतो. बदलामुळे मात्र, वातावरणातील मोहफूल उत्पन्नात कमालीची घट होत आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वैतागवाडी येथील खुरकुटे कुटुंबाच्या घर परिसरात मोहफुलांची जवळपास सात ते आठ मोठमोठी झाले आहेत. दरवर्षी हे कुटुंब एक ते दीड पोते मोहफुले वेचत असतात. पहाटे उठल्यानंतर लागलीच मोहफुले वेचण्याचे काम केले जाते. मात्र यंदा मोहफुलांचे उत्पादन घटल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मोहफुलांचे उत्पादन घटल्याने आता मोहफुलाला येणारी फळे म्हणजे मोहट्या देखील आलेल्या नाहीत. या मोहट्याच्या माध्यमातून तेल काढले जाते. उन्हाळ्यात याच तेलाच्या माध्यमातून गुजराण केली जाते. मात्र मोहफुलेच आली नसल्याने मोहट्या देखील नसल्याची खंत खुरकुटे कुटुंबाने बोलून दाखवली.
मोहफुलांची बारा महीने साठवण
यंदा मोहफुलांचे उत्पादन घटले आहे. मात्र दरवर्षी ही मंडळी मोहफुले वेचून झाल्यावर कडक उन्हात वाळवितात. त्यानंतर कडक उन्हात सुकविलेली मोहफुले प्लास्टिक कागदाच्या आवरणात हवाबंद डब्यात व्यवस्थित साठवून ठेवली जातात. पुढील वर्षी मोहफुलांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ती मोहफुले विक्रीसाठी काढली जातात. त्यांना 'जुनी मोहफुले' असे संबोधले जाते. त्या मोहफुलांना अधिक मागणी असते. जुनी मोहफुले मोजक्याच कुटुंबांकडे साठवून साठवून ठेवली जातात. त्यामुळे जुन्या मोहफुलांसाठी अधिक किमत मोजावी लागते.