त्र्यंबकेश्वर : चैत्राचा महिना सुरू झाला की, अनेक झाडे बहरतात. त्यात पिवळ्याधमक फुलांचा आणि पावसाचा इंडिकेटर म्हणून परिचित असलेला बहावा यंदा बहरला असून, बहरलेला मनमोहक बहावा पाहताना नेत्रसुख मिळते. बहावा बहरल्याने यंदा पाऊस चांगला पडणार असल्याचे यातून संकेत मिळत आहेत.
तापमानाचा पारा चाळिशी पार करीत असला तरी या काळात रस्त्याच्या कडेने फुललेले बहाव्याचे झुंबर पाहून आल्हाददायक अनुभव येऊ लागला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात बहाव्याच्या झाडांना बहर आला आहे. बहाव्याची झाडे पिवळ्या फुलांनी डवरून गेली आहेत. झाडांचा हा बहर म्हणजे पाऊस लवकर येण्याचा संकेत मानला जातो. वृक्ष सावलीबरोबरच निसर्गातील बदलांची चाहूलही देतात. बहावादेखील त्यापैकीच एक असून, त्याला 'नेचर इंडिकेटर' असेही संबोधले जाते. पानझड सरून आता चैत्राची पालवी फुटू लागली आहे. बहावा फुलल्यानंतर साधारण ४५ ते ५० दिवसांनी पाऊस पडतो, असा संकेत असल्याचेही जाणकारांचे मत आहे.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुके वनसंपत्तीने समृद्ध असलेले तालुके आहेत. या तालुक्याच्या जंगलात अनेक वनस्पती आहेत. यात बहाव्याचाही समावेश आहे. आयुर्वेदात बहावा या वनस्पतीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहाव्याच्या शेंगांमध्ये औषधीगुण असल्यामुळे या शेंगांचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. खेड्यापाड्यात आजही काही आजारांवर बहाव्याच्या शेंगांचा उपयोग करण्यात येतो. निसर्गातील प्राणी, पक्षी व वनस्पती भविष्यात घडणाऱ्या घटनांचा वेळोवळी संकेत देत असतात याला वैज्ञानिक आधार नसली तरी एक प्रचलित मान्यता आहे.
वृक्ष फुलल्याने अचूक अंदाज..
पूर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणतेही साधने व आधुनिक यंत्रसामग्री नव्हती की हवामान शास्त्रही नव्हते. निसर्गच पावसाचा अंदाज देत असे आणि आताही देतच आहे. पावसाच्या आगमनाची असाच चाहूल देणारा बहावा मोठ्या प्रमाणावर बहरला आहे. पिवळ्याधमक रंगाची फुले या बहाव्याला आली आहेत. बहाव्याला बहर येण्याचा मार्च ते मे हा काळ आहे. यावर्षी हा बहावा वेळेवर फुलोऱ्यावर आल्याने यंदा वेळेवर पाऊस पडण्याचे संकेत बहावा मिळत आहेत.
आताच्या वैज्ञानिक युगात प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रत्येक गोष्टीची पूर्व कल्पना मिळत असली तरी ग्रामीण भागातील शेतकरी अदिवासी समाज पाऊस वेळेवर येणार का उशिरा याचा अचूक अंदाज बांधतात. त्यामुळे अनादीकाळापासून निसर्गच नैसर्गिक बदलाचा व पावसाचा अंदाज देत असतात. बहावा हिवाळ्यात पर्णहीन असतो तर मार्च ते मे महिन्यात पूर्णतः फुलून येतो.