अवकाळी पाऊस व धुक्यामुळे तूर पिकाला मोठा फटका बसला आहे. सध्या तूर काढणी सुरू झाली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. शेतकऱ्याला एकरी केवळ एक क्विंटल तूर हाती येत आहे. त्यामुळे पिकाला लागलेला खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस कमी असल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांना तूर पिकाकडून आशा होती. मात्र, तूर उत्पादनात मोठी घट होत असून, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करूनही काही फायदा झाला नाही. अवकाळी पाऊस व सतत पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ
शेतकरी मंगेश भगत म्हणाले की, तूर काढणी सुरू आहे. परंतु, यंदा अपेक्षित उत्पन्न हाती येत नाही. एकरी एक क्चिटल तूर होत आहे. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. खरिपातील सोयाबीन व इतर पिकांचेही नुकसान झाल्याने चिंता वाढली आहे. शेतकरी गणेश पाटील म्हणाले की, अवकाळी पावसामुळे तुरीच्या शेंगा गळाल्या. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे. अशावेळी शेतकऱ्यांचा लागलेला खर्चही निघत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने मदत जाहीर करावी..
शेतकरी संदीप ढोरे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे तांदळी परिसरातील खरीप पिके हातातून गेली व आता शेतकऱ्यांना तूर पिकाकडून अपेक्षा होती. तूर काढणीला आली असता एकरी 1 ते 2 किंटल उत्पादन होत आहे. त्यामुळे लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी गणेश शेंडे म्हणाले की, 2 ते 3 वेळा वेगवेगळ्या फवारणी करून सुद्धा काहीच फरक पडला नाही. अवकाळी व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. एकरी एक किंटल तूर उत्पादन होत आहे. शासनाने मदत जाहीर करावी, सुरुवातीलाच पावसाने दड़ी मारल्याने खरीप पिके हातातून गेली. त्यातून सावरून शेतकऱ्यांची सर्व आशा ही तूर पिकावर होती. मात्र, अवकाळी पाऊस व सतत धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात घट दिसून येत आहे.
कृषी विषयक बातम्या मिळवण्यासाठी लोकमत ॲग्रो व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा