Join us

Water Scarcity : ऐन पावसाळ्यात 'या' महिला झिऱ्यावरचं पाणी का भरत आहेत? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 7:20 PM

Water Scarcity : कश्यपी धरण 100 टक्के भरले आहे. मात्र धरण परिसरात राहणाऱ्या खाड्याची वाडी येथील महिलांना झिऱ्यावरून पाणी भरावे लागत आहेत.

नाशिक : यंदाच्या पावसाळ्यात (rainy Season) नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब (water Dam) भरली आहेत. गंगापूर धरणाच्या उर्ध्व बाजूला असलेले कश्यपी धरणही 100 टक्के भरले आहे. मात्र धरण परिसरात राहणाऱ्या खाड्याची वाडी येथील महिलांना झिऱ्यावरून पाणी भरावे लागत आहेत. याच धरणांत येथील शेतकऱ्यांच्या जमीनी जाऊनही तहान भागविण्यापूरते पाणी सुद्धा नशिबी नसल्याचे येथील परिस्थितीवरून दिसून येते. 

नाशिक जिल्ह्यात (Nashik Dam Storage) यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून यंदा धरणे भरली आहेत. गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) उर्ध्व बाजूला असलेले कश्यपी धरण काठोकाठ भरले आहे. हे धरण जवळपास १०० टक्के भरले आहे. याच धरणाच्या पोटाला हजार पंधराशे वस्तीचे खाड्याची वाडी आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही इथल्या महिलांना भर पावसाळ्यात झिऱ्यावरून पाणी भरावे लागत आहे. सकाळपासून या झिऱ्यावर महिलांची लगबग पाहायला मिळते. 

सकाळच्या सुमारास पाणी नेण्यासाठी आलेल्या महिला म्हणाल्या की, 'धरण भरलंय पण प्यायला पाणी नाही. डोंगरावरून येणारे पाणी खाली येत असल्याने तिथे खड्डा करून पाणी अडवले जाते. तेच पाणी हळूहळू का होईना हंड्यात भरले जाते. अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. उन्हाळा-पावसाळा पाण्यासाठी दाहीदिशा भटकाव्या लागतात. धरणासाठी जमिनी दिल्या, पण ते पाणी तिकडे शहरातल्या लोकांना सोडतात, मग आम्ही करायचं?' असा सवालच त्या महिलेने उपस्थित केला. 

धरण उशाला आणि कोरड घशाला एकीकडे या धरणाला लागून खाड्याची वाडी, धोंडेगाव, देवरगाव, गाळोशी आदी गावे आहेत. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी या धरणात गेल्या आहेत. खाड्याची वाडी येथीलही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. गावाला मिळेल, मुलांना नोकऱ्या मिळतील या अपेक्षेने या शेतकऱ्यांनी जमिनी धरणासाठी देऊ केल्या. मात्र आजही नोकरीसाठी आणि हक्काच्या पाण्यासाठी भांडावे लागत असल्याचे चित्र आहे. येथील महिलांना धरणाच्या वरील बाजूस असलेल्या झिऱ्यावरून पाणी भरावे लागत आहे. एक दिवस पाणी भरायचं आणि दुसऱ्या दिवशी कामाला जायचं असं नियोजन येथील महिलांना करावे लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले.  

टॅग्स :गंगापूर धरणपाणीपाणी टंचाईधरणपाऊस