नाशिक : अवकाळी पावसाने नुकसान, शेतकऱ्यास पंचनाम्यातील मानवी चुकांचा बसणारा फटका टाळण्यासाठी आता नाशिकमध्ये (Nashik) लवकरच ई-पंचनामा अँप वापरात येणार आहे. त्यावर वस्तुस्थितीवर आधारित पंचनामा नोंदवला जात असल्याने कोणत्याही प्रकारच्या हेराफेरी करण्यास वाव राहणार नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.
नागपूरच्या धर्तीवर नाशिक जिल्ह्यात (Nashik District) लवकरच 'ई-पंचनामा' अँप सुरू करण्यात येणार आहे. नुकसानीची पाहणी करण्याकरिता स्वतः तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जातील. तेथील छायाचित्र घेऊन संबंधित अँपवर अपलोड केली जाईल. अँप्लिकेशनवर आधीच भरण्यात आलेल्या मंडळनिहाय सर्व्हे व गट क्रमांकनिहाय नुकसानीची माहिती तहसीलदारांकडून तपासली जाईल, त्यांच्या मंजुरीनुसार विभागीय महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आल्यानंतर तेथून ती माहिती राज्य सरकारकडे जाईल.
त्यानंतर सरकारच्या नियमानुसार जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा होते. याचा अर्थ नुकसानभरपाई आता अवघ्या एक आठवड्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे शक्य होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी वाघ यांनी सांगितले. अनेकदा पंचनामा करण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण व्हायच्या त्यामुळे प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये वाद व्हायचे ते आता थांबणार आहे. याबाबत जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचे एकत्रित प्रशिक्षण घेण्यात आले. लवकरच यावर कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले.
तालुकापातळीवर देणार प्रशिक्षण...
जिल्हास्तरीय प्रशिक्षण झाल्यानंतर आता पुढील आठवड्यात प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महसूल व कृषी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण दिल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना हे अँप देण्यात येईल. प्रशिक्षण झाल्यानंतर पुढील सर्व पंचनामे प्रत्यक्ष त्यावरच घेतले जातील.