जळगाव : परिसरात केळीला वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत आहे. दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत आहे. यापासून उभ्या केळीचा बचाव करण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. केळीला पूर्णवेळ पाणी देणे गरजेचे आहे, मात्र विहिरींचेही पाणी आटल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. पाणी कमी आणि तापमान प्रचंड अशी स्थिती केळीला मारक ठरत आहे.
जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन घेतले जाते. सद्यस्थितीत केळीच्या काढणीला वेग आला आहे. मात्र दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक शेतकरी आपल्या शेतातील जुन्या विहिरींना उभ्या आडव्या बोर करीत असून विहिरींचे खोदकाम करताना दिसत आहेत. वाढत्या तापमानात केळी वाचविण्यासाठी बळीराजाची तारेवरची कसरत सुरू आहे. केळीला पाणी कमी मिळत असल्याने केळीचे खांब व त्याची पाने जळून जाऊ लागली आहेत.
बोर्ड भावापेक्षा मिळतो कमी भाव
भालोदला केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीच्या बोर्ड भावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक व्यापारी मनमानी भावाने केळी घेतात. यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे व शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.
आंबा दाखल झाल्याने...
भालोद येथील केळी उत्पादक गणेश नेहते म्हणाले की, गेल्या १५ दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे केळीचा परिपक्व माल मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. व्यापारी बोर्ड भावापेक्षा कमी भावाने केळीचा माल शेतकऱ्यांकडून खरेदी करीत आहेत. बाजारपेठेत आंबा दाखल झाल्याने केळीची मागणी घटली आहे. तर कृषिभूषण नारायण शशिकांत म्हणाले की, चौधरी भालोद आणि परिसरात जून महिन्यात केळीच्या टिश्यू रोपांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणावर केळी निघत आहे. गुजरात व सोलापूर येथूनसुद्धा बाजारपेठेत केळीची मोठी आवक होत असल्याने मागणी घटली आहे.