Join us

Banana Crop : खान्देशात केळी, पपई पिकावर अवकाळी पावसाचा परिणाम, रोपांची टंचाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 9:14 PM

मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे बुरशीजन्य व मर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

जळगावसह नंदुरबार, धुळे जिल्ह्यात केळी, पपई पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र बहुतांश भागात अवकाळी पाऊस बरसल्याने अनेक केळी, पपई पिकांचे नुकसान झाले असून पिकावर रोगराई पसरली आहे. त्यामुळे नव्याने रोपांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागत असून रोपांची टंचाई निर्माण झाली आहे. 

केळीची साधारणतः १७ रुपयांपासून २० रुपयांपर्यंत, तर पपईची १४ रुपयांपासून ते १७ रुपयांपर्यंत एक रोप याप्रमाणे शेतकऱ्यांनी महागडी रोपे आणून लागवड केली आहे. मात्र मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे बुरशीजन्य व मर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे झाडे जागेवरच कोरडी होत असून झाड पिवळे होऊन जागेवरच कोमजून कोरडे पडत असल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. पपईप्रमाणे केळीची रोपेदेखील याच पद्धतीने मर रोगाला बळी पडत आहेत. 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडासह परिसरात पपई व केळी पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच अवकाळी पाऊस व वादळाने नुकसानीथी झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांवर आता पपई व केळी पिकावर आलेल्या मर रोगाने भर घातली आहे. सारंगखेडासह परिसरातील पुसनद, टेंभा, देऊर, खैरवे, कुन्हावद, कौठळ, बिलाडी, ससदे, शेल्टी, बामखेडा परिसरात केळी आणि पपई पिकाची मोठ्चा प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. केळी आणि पपई या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असून, यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

केळी व पपईच्या रोपांची टंचाई

केळी व पपई पिकावरील मर रोगामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी अत्यंत महागडी रोपे आणून त्यांची लागवड केली आहे. ही रोपे जगली नाही तर पुन्हा नवीन रोपे आणून लागवड करावी लागणार आहे. त्यातच सध्या सर्वच नर्सरीमध्ये केळी आणि पपई या रोपांची टंचाई आहे. जास्तीचे पैसे मोजूनदेखील शेतकऱ्यांना रोपांची टंचाई भासत असल्याने या दुहेरी संकटाला शेतकरी सामोरे जात आहे. काही शेतकयांनी फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या पपईच्या झाडांवर सर्वाधिक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.

टॅग्स :शेतीकेळीपीक व्यवस्थापनपाऊसजळगाव