जळगाव : गेल्या महिनाभरापासून अती तापमानामुळे नागरिक त्रस्त असताना, केळीलादेखील मोठा फटका बसत आहे. अतिउष्णतेमुळे केळीच्या कांदेबागाला मोठा फटका बसला असून, केळीचे पाने पिवळे पडत आहेत. त्यातच ऐन उन्हाळ्यात केळीला पाण्याची गरज असताना अनेक भागांमधील बोअरवेल आटल्यामुळे तालुक्यातील गिरणा व तापी नदीच्या काठावरील केळीचा पट्टा धोक्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात रावेरसह चोपड़ा व जळगाव तालुक्यातील तापी व गिरणा नदी काठावरील अनेक भागांमध्ये केळीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यामध्ये जळगाव तालुक्यात गिरणा काठावर आव्हाणे ते पळसोद, तर तापी काठावरील खापरखेडा ते भोकरपर्यंतच्या भागात केळीची लागवड केली जाते. मात्र, अती उष्णता, पाणीटंचाई, विजेची समस्या व वाळूमाफियांनी नदीपात्रातून केलेल्या उपशामुळे खालावलेली भूजल पातळी यामुळे भविष्यात जळगाव तालुक्यात प्रसिध्द असलेला केळीचा हा झोन धोक्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात 42 अंशापेक्षा अधिक तापमानाचा पारा अनेक दिवस कायम राहिला यामुळे केळीच्या बागांना सनबर्नचा धोका निर्माण झाला आहे.
अती उष्णतेच्या निकषात महसूल मंडळ होणार पात्र?
हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत एप्रिल महिन्यात सलग पाच दिवस ४२ अंशांपेक्षा अधिक तापमान राहिले, तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना अतीउष्णतेच्या निकषाखाली हेक्टरी ३५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळते. एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील ८६पैकी सुमारे ५० महसूल मंडळांमध्ये ४२ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या अतीउष्णतेच्या निकषात पात्र होण्याची शक्यता आहे
अपूर्ण वीज, अपूर्ण पाण्याची समस्या
केळी पिकाला नेहमी 3 पाण्याची आवश्यकता असते. मात्र, शेतकऱ्यांना केवळ आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यातदेखील अनियमितता असते. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. केळी उत्पादक शेतकयांना दिवसभरात २२ तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकरी संघटनाकडून केली आात आहे.
प्रचंड उष्णतेच्या काळात केळीला दिवसाला २० ते २२ लीटर पाण्याची गरज असते. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या ऐन उन्हाळ्यात बोअरवेल आटल्या आहेत. अनेकांच्या बोअरवेलमधून कमी दाबाने पाणी येत असल्याने एका खोडाला ४ ते ६ लीटरच पाणी दिले जात असल्याची माहिती कठोरा येथील केळी उत्पादक शेतकरी डॉ. सत्वशील प्राधव यांनी दिली.
नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये लागवड असलेल्या केळीला फटका
अती उष्णतेचा सर्वाधिक फटका नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये लागवड करण्यात आलेल्या बागांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. अती उष्णतेमुळे पाने पिवळी पडत आहेत. त्यातच वाऱ्याचाही वेग १५ ते २० किमी इतका आहे. यामुळे पाने फाटली आहेत. या प्रकारामुळे केळीची वाढ सुंटली आहे. केळीच्या बागांसाठी ९० ते ४२ दरम्यानमधील तापमान पुरक असते. मात्र, महिनाभरापासून तापमान ४२ पेक्षा जास्त असून, गेल्या चार दिवसात तापमानाने ४३ अंशाचा पल्ला गाठला असल्याने केळीला फटका बसत आहे.