Fodder Production : केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांनी ५ एप्रिल २०२५ रोजी झाशी येथील भारतीय गवताळ प्रदेश आणि चारा संशोधन संस्थेला (ICAR-IGFRI) भेट दिली. यावेळी त्यांनी देशभरात चाऱ्याची (Fodder Lack) उपलब्धता आणि शाश्वत गवताळ प्रदेश व्यवस्थापन वाढवण्यासाठी केले जात असलेले संशोधन कार्य आणि प्रादेशिक नवोपक्रमांचे निरीक्षण केले.
यावेळी त्यांच्यासोबत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिव (DAHD) श्रीमती अलका उपाध्याय आणि पशुसंवर्धन आयुक्त डॉ. अभिजित मित्रा होते. माननीय मंत्र्यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधला आणि संस्थेने विकसित केलेल्या नवीनतम खाद्य तंत्रज्ञानाच्या आणि सर्वोत्तम पद्धतींच्या प्रदर्शनाची पाहणी केली.
यावेळी बोलताना राजीव रंजन सिंह यांनी देशात सध्या हिरव्या चाऱ्याची ११ टक्के असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. या आव्हानाला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांची गरज असल्याचे ते म्हणाले. सध्या केवळ ८५ लाख हेक्टर जमिनीवर चारा पिकवला जात आहे, तर भारतात सुमारे १.१५ कोटी हेक्टर गवताळ प्रदेश आणि सुमारे १० कोटी हेक्टर नापीक जमीन आहे, जी चाऱ्यासाठी वापरली जाऊ शकते.
नापीक जमिनीवर चारा निर्मिती
"चाऱ्याबाबत स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी आणि पशुधन उत्पादकता वाढवण्यासाठी या कमी वापरात असलेल्या संसाधनांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले. देशभरातील कृषी विज्ञान केंद्रांद्वारे (केव्हीके) या तंत्रज्ञानाचा जलद प्रसार करण्याची गरज यावर भर दिला. त्यांनी विशेषतः बारमाही गवतांच्या उपयुक्ततेवर भर दिला, जे प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितीतही टिकू शकतात आणि नापीक जमिनी पुनरुज्जीवित करण्यास, पर्यावरणीय संतुलन राखण्यास आणि वर्षभर सतत हिरवा चारा पुरवण्यास मदत करू शकतात.
पशुधन विभागाला मजबूत करण्यासाठी....
पशुधन क्षेत्राला मजबूत, लवचिक आणि स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकार विज्ञान, नवोन्मेष आणि सहकारी प्रशासन हे प्रमुख आधारस्तंभ मानते, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सिंह यांनी आयजीएफआरआयच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला आणि चारा विकास आणि गवताळ प्रदेश सुधारणेसाठी संस्थेला देशातील प्रमुख ज्ञान आणि नवोन्मेष केंद्र बनण्यास प्रोत्साहित केले.
नाविन्यपूर्ण चारा प्रदर्शनी
याप्रसंगी दाखवण्यात आलेल्या प्रमुख तंत्रज्ञानांमध्ये सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या पशुधनासाठी एकात्मिक शेती प्रणाली (IFS), एकसमान आणि शाश्वत उत्पादनासाठी बारमाही गवतांचे अपोमिक्टिक प्रजनन तंत्रज्ञान, चारा उत्पादनासाठी विशेष कृषी अवजारांचा विकास, चारा बियाण्यांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी मानके आणि प्रमाणन प्रणाली आणि बियाणे गोळ्यांद्वारे ड्रोन आधारित चारा प्रदेश पुनर्संचयित करणे यासारख्या नाविन्यपूर्ण पद्धतींचा समावेश होता.