नाशिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत येत असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आदिवासी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या वर्षात हायटेक नर्सरीतून आदिवासी भागातील तरुणांना केसर आंब्याची कलमे तयार करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
नाशिकच्या आदिवासी पट्टा असलेल्या सुरगाणा, पेठ, कळवण, त्र्यंबकेश्वर आदी भागात आंबा लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. यात प्रामुख्याने शासनाच्या माध्यमातून फळबाग लागवड योझेनद्वारे अनेक भागात आंबा लागवड करण्यात आली आहे. हे क्षेत्रही मागील काही वर्षात वाढले आहे. यात आदिवासी तरुणांचा सहभाग अधिक असल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केसर आंब्याची कलमे तयार करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी तरुणांना आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये द्राक्ष पिकासह अनेक फळबाग लागवड करण्यात येते. यात आंबा देखील लागवड केला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागातील तरुणांना द्राक्षासह केसर आंब्याची कलमे तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणातूनच रोपे तयार होतील आणि त्यातन रोजगारनिर्मितीही होईल, या उद्देशाने मुक्त विद्यापीठाने नर्सरी प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे द्राक्षामध्ये कलम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रमही तयार केला.
असा असणार प्रशिक्षण कार्यक्रम
कृषी विज्ञान केंद्रातर्फे नर्सरी व्यवस्थापनावर 15 ते 30 दिवसांचा कॅम्पस व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो. ग्राफ्टिंगमध्ये कौशल्य, संरक्षक संरचना, विपणन धोरणे, बाजार सर्वेक्षण, अनुदानासाठी अर्थसाहाय्य प्रस्ताव इत्यादींबाबत मार्गदर्शन देण्यात येते. प्रशिक्षणासाठी क्लासरूम टीचिंग, एक्स्पोजर व्हिजिट, दैनंदिन खासगी रोपवाटिकेच्या कामात सहभाग इत्यादी पद्धतींचा अवलंब करण्यात येत असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी दिली.
द्राक्षासाठीही रोपवाटिका
द्राक्षासाठीही नाशिकनगरी उत्कृष्ट समजली जाते. येथील द्राक्षांची चवच न्यारी असल्याने त्यांच्या कलमांनाही देशभरातून चांगली मागणी असते. मात्र द्राक्ष कलम करण्यासाठी निष्णात मनुष्यबळाची कमतरता आहे. हे हेरून नाशिकच्या कृषी विज्ञान केंद्राने बेरोजगार ग्रामीण तरुणांना फलोत्पादन रोपवाटिका व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा त्यालाही मूर्तस्वरूप मिळणार आहे.