Join us

Wildlife Enumeration : बुद्ध पौर्णिमेच्या चांदणी रात्री वन्यप्राणी गणना का केली जाते? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 7:26 PM

दरवर्षी वनविभागातर्फे बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यारात्री वन्यप्राण्यांची गणना केली जाते.

जंगलातील रात्रीची गूढ शांतता, अधूनमधून दृष्टिक्षेपास पडणारे वन्यप्राणी, त्यांच्या हालचाली, पाणवठ्यांवरील वातावरण अनुभवण्यासाठी वनविभागातर्फे दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यारात्री वन्यप्राण्यांची गणना केली जाते. गणनेमुळे एखाद्या वनात कोणकोणते वन्य प्राणी आहेत, कोणत्या वन्य प्राण्यांच्या संख्येत बदल झाला आहे, कोणते प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत याची नोंद घेतली जाते.

वन्यप्राण्यांची, गणना करण्यासाठी जंगलात मचाणाची उभारणी केली जाते. वर्षभरात जंगलातील प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ, घट, एखादा नवीन प्राणी दाखल झाला आहे का आदींच्या नोंदी घेण्यासाठी वनविभागातर्फे दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या रात्री अभयारण्यांत प्रत्यक्ष पाणवठ्याशेजारी मचाणावर बसून वन्यप्राण्यांची मोजणी केली जाते. पाणी उपलब्ध असलेल्या पाणवठ्यांची यादी केली जाते. जंगलातील पाणवठ्यांनुसार विभाग निश्चित केले जातात. प्रत्येक पाणवठ्यावर एक लपण किंवा मचाण उभारतात. एका मचाणावर एक वन कर्मचारी आणि एक प्राणीप्रेमी असतो. प्राण्यांच्या नकळत दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सलग गणना सुरू राहते. पाणवठ्यावर येणाऱ्या प्रत्येक प्राण्याचा प्रकार, नर किंवा मादी आणि वेळ याची नोंद घेतली जाते.

बुद्ध पौर्णिमेलाच प्राणिगणना का?

उन्हाळ्यातील सर्वाधिक प्रकाश बुद्धपौर्णिमेच्या रात्री असतो. या रात्री स्वच्छ प्रकाशामुळे जंगलातील वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपणे सहज शक्य होते.- उन्हाळ्यात जंगलातील काही पाणवठे आटतात तहान भागविण्यासाठी वन्यप्राणी पाणी उपलब्ध असलेल्या पाणवठ्यांवर आवर्जून हजेरी लावतात. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या प्रत्यक्ष जंगलाच्या साक्षीने पाणवठ्चाशेजारी बसून प्राण्यांच्या निरीक्षणाच्यावेळी वन्यप्राणी सक्रिय असतात. रात्री सगळे प्राणी किमान एकदा तरी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येतात.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

अलीकडे वनविभागातर्फे प्राणी मोजण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणा, कॅमेरा ट्रॅपसह अन्य साधनांचा वापर करून वन्यप्राणी गणना केली जात असते. अभयारण्यात मचाण बांधून पाणवठ्यावरील नोंदीची पारंपरिक पद्धत आजही सुरू ठेवण्यात आलेली आहे.

- विलास खोब्रागडे, सिल्ली

टॅग्स :शेतीवन्यजीवजंगलवनविभाग