Join us

Fang Ranbhaji : दुष्काळातही वरदान ठरणारी रानभाजी फांग आता दुर्मिळ, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 3:17 PM

Fang Ranbhaji : रासायनिक खते-औषधे यांचा भडिमार यामुळे गावकुसापासून ही रानभाजी दूर जात माळरान, जंगलातच पाहावयास मिळते.

- संजय हिरेजळगाव : फागना पाला खायीसन दिवस काढात..! खेड्यापाड्यात घरातील आजी- बाबांकडून सांगितल्या जाणाऱ्या जुन्या आठवणीतील ही फाग.. फांग... फांजी अशी भागपरत्वे नावे असलेली रानभाजी (Ranbhaji) आता दुर्मीळ होत चालली आहे. मात्र तरीदेखील रानावनात, जंगलात, डोंगरात तिचा वेल या पावसात बहरलेला दिसतोय. मात्र, त्यासाठी ती पारखणारी दृष्टी हवी.

पूर्वी अन्नधान्य फारसे पिकत नव्हते. त्यातही दुष्काळ पडला म्हणजे गरिबी व एकत्र कुंटुंब पद्धतीत खाणारी तोंडे अधिक असल्याने खर्च परवडणारा नव्हता. अशात रेशनवर मिळणारी लाल अडगर (अमेरिकेतून आलेले धान्य) तसेच सातपानी, माने, चिकणी व उंच वाढणारी भोरसे, ज्वारीचे पीठ आणि फांग ही वेलवर्गीय रानभाजीच्या पाल्याचे मुटकुळे, फुणके, धपाटे, शेंगोळे, भजी व भाजी करत असत. ती खाऊनच गुजराण करावी लागे.

तेव्हा दिवस काढले आता रानठेवा दुरावतोयफांग ही वेलवर्गीय रानभाजी. नदीकाठी, रानातील काटेरी साबर, काटेरी झुडपे यावर तो वेल वाढतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे तो जमिनीत खूप खोलवर जात असल्याने दुष्काळातही (Drought) तग धरुन असतो. पावसाळ्यात पुन्हा हिरवा होत पाला लागतो. १९७२ चा दुष्काळ आठवला म्हणजे फांगचा पाला खाऊन दिवस काढलेत ही आठवण वृद्ध काढतात. आता फांग सहज आढळत नाही. वृक्षतोड, चराई, रासायनिक खते-औषधे यांचा भडिमार यामुळे गावकुसापासून ही रानभाजी दूर जात माळरान, जंगलातच पाहावयास मिळते.

चविष्ट रानभाजी 

फांगचा वेल शेळ्यांचे आवडीचे खाद्य. फागची पाने छोटी, हिरवी काळपट असतात. कोवळ्या पानांचा वापर खाण्यासाठी करतात. ज्वारी, तूर, उडीद आदी डाळीचे पीठ, तिखट-मीठ टाकत ते भिजवून अळूवड्याप्रमाणे पानाला लावत उकडतात. शिजल्यानंतर तव्यावर परतून चवीला खरपूस होतात. पाला चिरून फुणके, भजी, भाजी करतात. ती चवदार लागते.

आजचा भाजीपाला दूषित !आजकाल सर्वच भाजीपाला रासायनिक खते, कीटकनाशके वापरल्यामुळे रसायनाचा अंश शिल्लक राहत दूषित झाला आहे. यामुळेच फागसारख्या सेंद्रिय अशा रानभाज्यांचा जाणूनबुजून आहारात समावेश करायलाच हवा व दुर्मीळ होत चाललेल्या रानभाज्यांचे संवर्धनदेखील करायला हवे. 

टॅग्स :भाज्याशेती क्षेत्रशेतीजळगावदुष्काळ