गडचिरोली : वन शेतीतून शेतकऱ्यांना आपला आर्थिक विकास करता येतो, ही बाब हेरून गडचिरोली तालुक्याच्या पारडी येथील शेतकरी वासुदेव निकुरे यांची आपल्या शेतात नीलगिरीची झाडे लावली आहेत. ही शेती त्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देत आहे.
वासुदेव निकुरे हे २०१४ पासून वन शेती करीत आहेत. त्यांनी ८ एकर क्षेत्रात नीलगिरी आणि सुबाभूळ लागवड केली आहे. नीलगिरीची उच्च दर्जाची क्लोनल रोपे खरेदी केली आणि आपल्या वन शेतीत ते आणखी भर देत आहेत. त्यांचे संपूर्ण उत्पन्न ते बल्लारपूर पेपर मिलला विकतात आणि उत्तम असा नफा मिळवतात. यातून ते फक्त नफाच नाही कमवत तर नीलगिरी आणि सुबाभूळ लावून पर्यावरणाचे संवर्धन करीत आहेत.
लागवड कशी करावी?
नीलगिरीच्या रोपट्यांची एकरी ९ बाय ३ फूट अंतरावर लागवड करावी. एकरी १ हजार ५०० रोपे लावावी. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गतसुद्धा शेतकरी लागवड करू शकतात. एकूण लागवडीपासून उत्पन्नापर्यंत २० हजार रुपये खर्च येतो. जवळपास ४ वर्षांनंतर नीलगिरीचे उत्पन्न मिळू शकते.
ओलिताखालील शेतीत सर्वाधिक उत्पन्न
सरासरी कोरडवाहू शेतीत ४० टन उत्पादन मिळते. सध्या ४ हजार २०० रुपये टन भाव आहे. १ लाख ७० हजार रुपये शेतकऱ्यांना हातात मिळतात. नंतर दर ३ वर्षांनी उत्पन्न मिळत राहते. ओलिताखालील शेतीमध्ये ५० ते ७० टनांपर्यंत उत्पन्न मिळते. २ लाख ते २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो.