गडचिरोली : शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे, शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाचे नाव आणि क्षेत्र निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता यावी, यासह विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी (Agri stack Farmer ID) बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, सदर पोर्टलवर एडिटचा पर्यायच नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या नावे चुकीची व अपुऱ्या माहितीचीही नोंद होत आहे.
फार्मर आयडी (Farmer Id) तयार करण्यासाठी शहरापासून गाव पातळीवरही मोठ्या प्रमाणात महसूल विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर तसेच सेतू केंद्रांमध्येही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांची येथे गर्दी उसळत आहे; परंतु नेटवर्क समस्या व सर्व्हर डाऊनच्या (Farmer id Server down) समस्येमुळे नोंदणी करण्यास अडचणी येत आहेत. जिल्ह्यात १ लाख ७८ हजार शेती खातेदार आहेत.
काय चुका होताहेत?
शेतकऱ्यांची विविध ठिकाणी शेतजमीन असल्यास तो केवळ रहिवासी गावातील शेतीची नोंदणी करीत आहे. महिला शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वाधिक चुका होत आहेत. महिलांच्या नावे आई-वडिलांच्या शेतात वाटा असतो. शिवाय मामाच्या शेतीच्या सातबारावरही नाव असते. त्यांना तेथील सर्व्हे नंबर नोंदविण्यास लक्षात राहत नाही. सदर चुका दुरुस्त करण्यासाठी एडिटचा पर्याय असणे आवश्यक आहे; परंतु ही सोय पोर्टलवर सध्या तरी उपलब्ध नाही.
सद्यस्थितीत अनेक शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी सीएससी केंद्रावर येत आहेत. तर दुसरीकडे पोर्टलवर सर्व्हर डाऊनमुळे अडथळा येत आहे. फार्मर आयडी काढताना शेतकऱ्यांनी सविस्तर माहिती द्यावी. जेणेकरून सोयीस्कररित्या अर्ज भरला जाईल. अन्यथा एका चुकीमुळे अर्ज पुन्हा भरण्याची नामुष्की येऊ शकते. कारण अद्यापपर्यंत फार्मर आयडी पोर्टल वर दुरुस्तीचा पर्याय देण्यात आलेला नाही.
- संविधान गायकवाड, सीएससी केंद्र चालक
शेतकरी नोंदणी आहे मोफत
फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड, आधार संलग्न मोबाइल क्रमांक, शेतकऱ्यांचे सर्व सातबारा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. विशेष म्हणजे ही नोंदणी मोफत आहे. सीएससी केंद्रांना नोंदणीचा मोबदला म्हणून प्रतिशेतकरी १५ रुपये दिले जाणार आहेत. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहायकांकडे नोंदणीची सोय केलेली आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना 'पीएम किसान सन्मान' योजनेचा लाभ मिळत राहील. कर्ज वितरण सुलभ होईल. पीकविमा, हमीभाव खरेदीचा लाभ तसेच कृषी योजनांचा लाभ घेण्यास अर्ज करता येईल.